Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बारीपाड्याचा हिरवा नायक! चैत्राम पवारांना राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा पद्मश्री

सहसंपादक अनिल बोराडे 

 नवी दिल्ली/बारीपाडा: एका दुर्गम आदिवासी पाड्याने देशाला दिशा दाखवली आणि त्या दिशेचे शिल्पकार ठरले चैत्राम देवचंद पवार! पर्यावरणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या कर्मयोग्याला काल (२८ एप्रिल) सायंकाळी नवी दिल्लीतील ऐतिहासिक राष्ट्रपती भवनात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मानाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा या पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली होती. आज त्यांच्या तपस्येचा आणि निस्वार्थ सेवेचा सर्वोच्च राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला.

पद्मश्री चैत्राम पवार 

चैत्राम पवार यांचा जीवनप्रवास हा कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा हा एक अतिशय दुर्गम आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेला आदिवासींचा पाडा. १९९२ पूर्वी या पाड्याची स्थिती अत्यंत दयनीय होती. समोर फक्त ओसाड माळरान दिसत होते आणि पिण्यासाठी पुरेसे पाणीही उपलब्ध नव्हते. महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत होती. गावात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे अनेकजण गाव सोडून शहरांकडे स्थलांतर करत होते. त्यातच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत होता.

अशा निराशाजनक परिस्थितीत चैत्राम पवार यांनी हार मानली नाही. त्यांनी परिस्थिती बदलण्याचा दृढनिश्चय केला. १९९२ मध्ये त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने वनसंरक्षण समिती स्थापन केली आणि वृक्षतोडीला कठोरपणे विरोध केला. स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून त्यांनी रोपे आणली आणि गावकऱ्यांच्या मदतीने ओसाड जमिनीवर वृक्षारोपण सुरू केले. केवळ झाडे लावून ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांची नियमित निगा राखली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बघता बघता ११०० हेक्टर माळरान हिरव्यागार वनराईने नटले. आज हे जंगल केवळ बारीपाड्याची शान नाही, तर परिसरातील अनेक गावांसाठी ऑक्सिजनचा आणि पाण्याची सोय निर्माण करणारे केंद्र बनले आहे.

चैत्राम पवार यांचे कार्य केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण केली. त्यांना जंगलाचे महत्त्व पटवून दिले आणि सामूहिक प्रयत्नांनी वन व्यवस्थापन कसे करावे, याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी सादर केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बारीपाडा गावाने संयुक्त वन व्यवस्थापनाचा एक यशस्वी मॉडेल तयार केले, ज्याची दखल केवळ राज्यानेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली.


या लोकचळवळीची दखल घेत जगातील ७८ देशांमधील तज्ज्ञांनी केलेल्या ‘चांगले गाव कसे असावे’ या सर्वेक्षणात बारीपाडाने दुसरा क्रमांक पटकावला होता, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची आहे. याशिवाय, बारीपाडा प्रकल्पाला अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा IFAD (International Fund for Agricultural Development) या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कारही मिळाला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या अतुलनीय योगदानाला सलाम करत त्यांना पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्कार प्रदान केला होता.

चैत्राम पवार यांच्या कार्याचा डोंगर खूप मोठा आहे. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी ५००० हून अधिक झाडे लावली. जैवविविधतेचे संवर्धन करत त्यांनी ८ दुर्मीळ प्राणीप्रजाती, ४८ पक्षीप्रजाती आणि ४३५ विविध प्रकारच्या झाडे, वेली व झुडुपांना आश्रय दिला. मृदा आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी समाजाच्या सहकार्यातून ४८५ लहान बंधारे आणि ४० मोठे बंधारे बांधले. ५ किलोमीटर लांबीच्या कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस (CCT) तयार करून धुळे जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवली, ज्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.

बारीपाडा गावात चैत्राम पवार यांनी ‘पिपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ (PBR) हा उपक्रम राबवून पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले. नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य केवळ बारीपाड्यापुरते मर्यादित नसून, महाराष्ट्र आणि गुजरातमधील १०० हून अधिक गावांमध्ये त्यांनी आदिवासी विकास, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन केले आहे.

आज दिल्लीतील पुरस्कार वितरण सोहळ्याला बारीपाडा आणि परिसरातील २५ ते ३० महिला व पुरुष खास उपस्थित होते. आपल्या हिरोचा सन्मान होताना पाहणे हा त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता. चैत्राम पवार यांचा हा सन्मान केवळ त्यांचा नसून, तो प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे, जी निसर्गासाठी समर्पित भावनेने कार्य करते. त्यांच्या कार्याची ज्योत पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, यात कोणतीही शंका नाही. बारीपाड्याचा हा हिरवा नायक आज खऱ्या अर्थाने देशाचा नायक ठरला आहे!

Post a Comment

1 Comments
  1. बारिपाडा गावाची जागतिक पातळीवर निर्माण करणारे चैत्राम पवार यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.