सहसंपादक अनिल बोराडे
मालेगाव... जिथे एका आईच्या ममतेची आणि धैर्याची हृदयस्पर्शी कहाणी घडली. योगिनी हिरे, अवघ्या ३० वर्षांची तरुणी, अचानक पोटदुखीच्या असह्य वेदनेने कळवळली. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली आणि सोनोग्राफी तसेच इतर चाचण्यांनंतर त्यांना नाशिकला जाऊन पुढील तपासणी करण्याचा सल्ला दिला. नियतीच्या मनात काय दडलं होत कुणास ठाऊक! नाशिकमध्ये डॉक्टरांनी योगिनीच्या यकृतातील गंभीर समस्या सांगितली आणि त्यावरचा एकमेव उपाय होता - यकृत प्रत्यारोपण.
पण हा मार्ग सोपा नव्हता. बाहेरून यकृतदाता मिळणे म्हणजे दुर्मिळ गोष्ट आणि त्यात प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची मोठी यादी... डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, "वेळ नाहीये!" तेव्हा रक्ताच्या नात्यातील कुणीतरी मदतीचा हात पुढे केल्यास त्वरित प्रत्यारोपण शक्य होतं. आणि इथेच एका आईचं काळीज द्रवलं. आपली लेक मृत्यूच्या दारात उभी आहे हे पाहून कल्पना बाळासाहेब पवार या माऊलीने क्षणाचाही विचार न करता आपल्या यकृताचा तुकडा देण्याची तयारी दर्शवली.
या कठीण समयी, योगिनी यांचे सासरे जिभाऊ धर्माजी हिरे, सासू निर्मला जिभाऊ हिरे, जेठ विशाल हिरे आणि पती युवराज हिरे यांनीही खंबीर साथ दिली. सुनेच्या प्राणासाठी कितीही पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी होती. संपूर्ण कुटुंबाने एकजुटीने या संकटाचा सामना करण्याचा निर्धार केला.
सर्व आप्तेष्टांचे आशीर्वाद घेऊन हे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू झाली. डॉ. समीर शाह, डॉ. गौरव चौबल, डॉ. मंगल डेम्बी आणि डॉ. विवेक तलालकर यांच्या निष्णात टीमने तब्बल अठरा तास ही शस्त्रक्रिया चालवली. योगिनीचे निकामी झालेले यकृत काढले आणि आई कल्पना यांच्या यकृताचा एक भाग तिच्या शरीरात प्रत्यारोपित केला. या कसोटीच्या काळात वडील बाळासाहेब पवार आणि भाऊ प्रशांत पवार यांचा आधार योगिनी आणि तिच्या आईला मिळाला.
आज या घटनेला दोन वर्षे लोटली आहेत आणि त्या माऊलीची माया आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे योगिनी आणि त्यांची आई दोघीही सुखरूप आहेत. नुकताच नानवटी मॅक्स ग्लोबल हॉस्पिटल ग्रुपने या मायलेकींच्या अदम्य साहसाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा मुंबईत सत्कार केला. एका आईने आपल्या काळजाचा तुकडा देऊन आपल्या लेकीचे प्राण वाचवले... खरंच, या माऊलीच्या ममतेपुढे शब्दही थिटे पडतात! धन्य ती माता आणि तिची अपार माया!
Post a Comment
0 Comments