पिंपळनेर येथे शिवसेना परिवाराचा स्नेहमेळावा उत्साहात; टोपी-रुमाल देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान, नारळ देत पारंपरिक औक्षण
पिंपळनेर.. सहसंपादक अनिल बोराडे
संपूर्ण महाराष्ट्रासह धुळे जिल्हा आणि साक्री तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद झाले असून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सण-उत्सवांमध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य देण्याची भूमिका साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळाताई गावित यांनी घेतली. याच भावनेतून भाऊबीजेचा सण अत्यंत साध्या, स्नेहपूर्ण आणि पारंपरिक वातावरणात साजरा करीत त्यांनी पिंपळनेर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे औक्षण करून बहिण-भावाच्या नात्यातील जिव्हाळा अधिक दृढ केला.
भाऊबीजेच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून पिंपळनेर येथील साई कृष्णा लॉन्स परिसरात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळाताई गावित आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीरामजी गावित यांनी शिवसेना परिवारातील पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार मंजुळाताई गावित यांनी पारंपरिक पद्धतीने दिव्यांच्या प्रकाशात उपस्थित शिवसैनिकांचे औक्षण केले. तसेच प्रत्येकाला नारळ देऊन भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. बहिणीच्या मायेने आणि आपुलकीने केलेल्या या औक्षणामुळे उपस्थित शिवसैनिकांमध्ये आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीरामजी गावित यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना टोपी आणि रुमाल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार मंजुळाताई गावित यांचे आशीर्वाद घेतले. राजकीय व्यासपीठावरील नेते आणि कार्यकर्ते एवढ्यापुरतेच नाते मर्यादित न राहता कुटुंबातील बहिण-भावाप्रमाणे जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकीचे नाते जपण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
विशेष म्हणजे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा, दिखाऊपणा अथवा अनावश्यक खर्च न करता साधेपणाने भाऊबीज साजरी करण्याचा निर्णय उपस्थितांच्या विशेष लक्षात आला. सणाचा खरा आनंद हा केवळ भव्य आयोजनात नसून माणसांमधील प्रेम, आपुलकी, एकोपा आणि परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यात असतो, याची प्रचिती या स्नेहमेळाव्यातून आली.
भाऊबीज हा केवळ औक्षणाचा सण नसून बहिण-भावाच्या प्रेमाचा, संरक्षणाचा आणि विश्वासाचा पवित्र उत्सव आहे. याच भावनेचे प्रतिबिंब मानत आमदार मंजुळाताई गावित आणि शिवसेना परिवारातील कार्यकर्त्यांच्या स्नेहपूर्ण भेटीतून दिसून आले. या कार्यक्रमामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक एकजुटीला बळ मिळण्यासोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील आपलेपणाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या स्नेहमेळाव्याला पिंपळनेर नगरपरिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक विजय गांगुर्डे, नगरसेवक ज्ञानेश्वर एखंडे,नगरसेवक संभाजी अहिरराव, नगरसेवक गणेश खैरनार, नगरसेवक भैय्या भाऊ चौधरी, नगरसेवक विलास सोनवणे , नगरसेवक दिलीप चौरे, नगरसेविका शोभाताई नेरकर, नगरसेविका भिकुबाई मालुसरे, नगरसेविका रेखाताई सूर्यवंशी, पी एस पाटील यांच्या सह शिवसेनेचे विविध पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. पारंपरिक औक्षण, सन्मान आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या भाऊबीज सोहळ्याने शिवसेना परिवारात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले.



Post a Comment
0 Comments