Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बारिपाड्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंती सप्ताहाचा दिमाखदार शुभारंभ!

 पद्मश्री चैत्राम पवार यांच्या स्वागतासह प्रतिमापूजनाने सप्ताहाला प्रारंभ धुळे जिल्ह्यातील गावागावांत आदिवासी अस्मिता, स्वाभिमान आणि क्रांतिकारी विचारांचा जागर!

पिंपळनेर.. सहसंपादक अनिल बोराडे 

आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि क्रांतीचा बुलंद आवाज असलेले महान स्वातंत्र्यसेनानी, जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती सप्ताहाचा उत्साहपूर्ण शुभारंभ बारिपाडा येथे करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन आणि पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक चैत्रामजी पवार यांचे सन्मानपूर्वक स्वागत करून या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.



भाजपा धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मा. रामकृष्ण बापू खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष व संयोजक तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. के. टी. सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून या जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक वारशाची जपणूक, भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रसार, सामाजिक जागृती आणि नव्या पिढीला आदिवासी महापुरुषांच्या संघर्षमय इतिहासाची ओळख करून देणे, हा या सप्ताहामागील प्रमुख उद्देश आहे.


भगवान बिरसा मुंडा यांची जयंती केवळ औपचारिक कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता ती समाजप्रबोधनाची व्यापक चळवळ बनविण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. साक्री तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आणि आदिवासी पाड्यांवर हा जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.


या सप्ताहादरम्यान विविध ठिकाणी जनजागृती अभियान, प्रबोधनपर व्याख्याने, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा, जल-जंगल-जमिनीच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, आदिवासी समाजाच्या अस्तित्वासाठी उभारलेली चळवळ आणि अन्यायाविरुद्ध पेटवलेली क्रांतीची मशाल यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.



भगवान बिरसा मुंडा हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर अन्याय, शोषण आणि गुलामगिरीविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारे महान क्रांतिकारक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, एकजूट आणि हक्कांची जाणीव निर्माण केली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. याच भावनेतून धुळे जिल्ह्यातील गावागावांत जयंती सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचा जागर करण्यात येणार आहे.


भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि के. टी. सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे आदिवासीबहुल ग्रामीण भागात भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा व्यापक प्रसार होण्यास निश्चितच मदत होणार आहे.


या शुभारंभप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष के. टी. सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, उपाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, पोबारेचे सरपंच वसंत अहिरे, रेखाबाई सूर्यवंशी, अश्विनी कोकणी, संदीप चौरे, दिनेश देवरे, पिंपळनेर मंडळाचे चिटणीस धनंजय घरटे, राजू चौधरी, गुलाब चौरे, वंजी पवार, पुण्या जगताप, पोपट बहिरम, पांडुरंग साबळे, ताराचंद गांगुर्डे, छोटीराम बागुल, लोटन सूर्यवंशी, पंकज सूर्यवंशी, योगेश भामरे यांच्यासह भाजपा आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बारिपाड्यातून सुरू झालेला हा जयंती सप्ताह आता धुळे जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार असून भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचा, आदिवासी अस्मितेचा आणि सामाजिक एकतेचा संदेश जनमानसात रुजविण्याचा निर्धार या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments