Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सटाणा रोडवरील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्री उशिरापर्यंत मद्यपान, हुल्लडबाजी आणि अरेरावीचा प्रकार स्थानिक नागरिक त्रस्त, पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

 जिल्हा परिषद कन्या शाळा बनली मद्यपींचा अड्डा!

पिंपळनेर.. सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर शहरातील सटाणा रोड परिसरातील सागर स्वीटसमोर असलेली जिल्हा परिषद कन्या शाळा सध्या मद्यपींचा अड्डा बनल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. ज्या शाळेच्या परिसरातून मुलींना शिक्षणाचे धडे मिळतात, त्याच शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी मद्यपींचा खुलेआम वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेचे शैक्षणिक पावित्र्य धोक्यात आले असून, शाळेचा परिसर मद्यपान करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनत असल्याचे चित्र आहे.



स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून काही मद्यपी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत, अगदी दोन वाजेपर्यंत शाळेच्या कंपाउंडमध्ये बसून मद्यपान करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. मद्यधुंद अवस्थेत मोठमोठ्याने आरडाओरड करणे, हुल्लडबाजी करणे, स्थानिक नागरिकांशी अरेरावी करणे तसेच भरवस्तीत वाहनांचे मोठमोठ्याने हॉर्न वाजवून दहशतीचे वातावरण निर्माण करणे, असे प्रकार नित्याचेच झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.



विशेष म्हणजे शाळेच्या आवारात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच मद्यपानासाठी वापरलेले इतर साहित्य विखुरलेले दिसून येत आहे. शाळा ही विद्यार्थिनींच्या शिक्षणाची आणि सुरक्षिततेची जागा असताना, त्याच परिसरात अशा प्रकारे मद्यपान सुरू असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. शाळेला सुट्टी लागल्याने सायंकाळी सात वाजल्यापासून मद्यपान करणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याचेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.


मद्यपींच्या आडून चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय असल्याचा संशय!


रात्री उशिरापर्यंत शाळेच्या आवारात अनोळखी व्यक्तींचा वावर, मद्यधुंद अवस्थेतील गोंधळ आणि संशयास्पद हालचाली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या ठिकाणी मद्यपानासाठी जमणाऱ्या व्यक्तींच्या आडून शहरातील अथवा परिसरातील चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असण्याची शक्यताही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या संशयाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या ठिकाणी नियमित गस्त घालून संशयास्पद हालचालींची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.


निवेदने, तोंडी तक्रारी करूनही परिस्थिती 'जैसे थे'!


या गंभीर प्रकाराबाबत शिक्षक व स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पोलिस प्रशासनाला निवेदने देऊन तसेच तोंडी स्वरूपात तक्रारी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार अद्यापही ठोस उपाययोजना झालेली नसल्याने मद्यपींचे धाडस वाढतच चालले आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच परिसरातील रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


शाळा शिक्षणासाठी की मद्यपानासाठी? नागरिकांचा संतप्त सवाल!


शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांना एवढे अभय नेमके कोणाचे? भरवस्तीत खुलेआम हुल्लडबाजी सुरू असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करीत आहे? नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार? असे संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.



पोलिस प्रशासनाने आता केवळ तोंडी आश्वासनांवर न थांबता तातडीने ठोस कारवाई करावी. शाळेच्या कंपाउंडची सुरक्षितता सुनिश्चित करावी, परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, रात्रीच्या वेळी नियमित पोलिस गस्त सुरू करावी, मद्यपान करणाऱ्यांची ओळख पटवून कायदेशीर कारवाई करावी तसेच शाळेच्या आवारात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


विद्येचे मंदिर असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेचा परिसर मद्यपींच्या विळख्यातून मुक्त होणार तरी कधी? प्रशासनाने एखादी अनुचित घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने जागे व्हावे, अन्यथा नागरिकांचा असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही!

Post a Comment

0 Comments