बोदगाव येथे पहाटे गोठ्याला भीषण आग शेतकऱ्याचे ८५ हजारांचे नुकसान!
पिंपळनेर .. सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील मौजे बोदगाव येथे गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान शेतकरी रामदास लाला पवार यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या गोठ्यात अचानक आगीचा भडका उडाला. या आगीत शेतीउपयोगी अवजारे, बाजूला साठवून ठेवलेले लाकूड तसेच जनावरांसाठी साठवलेला संपूर्ण चारा जळून खाक झाला. या दुर्घटनेत अंदाजे ८० ते ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यावर ओढवलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहाटेच्या शांततेत आगीचा भडका; शेतकऱ्याचे मोठे नुकसान!
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे रामदास पवार यांच्या घरामागील गोठ्यात अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. गोठ्यात साठवून ठेवलेले शेतीसाठी लागणारे साहित्य, लाकूड आणि जनावरांसाठी ठेवलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीची तीव्रता लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीने साहित्याला पूर्णपणे वेढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
संगिता गावीत, गणेश गावीत व कांतीलाल भोये यांची तातडीने धाव!
घटनेची माहिती मिळताच माजी पंचायत समिती सदस्य संगिता गावीत, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावीत, माजी उपसरपंच कांतीलाल भोये यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश गावीत यांनी या घटनेची माहिती तातडीने पिंपळनेर पोलीस ठाण्याला कळविली.
पोलीस आणि अग्निशमन दलाची तत्परता; काही वेळात आगीवर नियंत्रण!
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पिंपळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. त्यामुळे आग आणखी पसरून मोठी दुर्घटना घडण्याचा धोका टळला.
महसूल विभागाकडून पंचनामा; आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट!
या घटनेची माहिती मिळताच बोदगावचे महसूल अधिकारी के. एच. वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व पंचनामा केला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित अहवाल सादर झाल्यानंतरच आगीमागील कारण समोर येणार आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे, लाकूड आणि जनावरांचा संपूर्ण चारा जळून खाक झाल्याने रामदास पवार यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत द्या! संगिता गावीत यांची प्रशासनाकडे मागणी
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना अशा प्रकारच्या आगीच्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळाल्याने पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल व संबंधित प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने नुकसानीचा सविस्तर पंचनामा करावा, शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मंजूर करावी तसेच शेतकरी रामदास लाला पवार यांना त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी माजी पंचायत समिती सदस्य संगिता गणेश गावीत यांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments