पिंपळनेर (सहसंपादक - अनिल बोराडे):
दिनांक ७ ऑक्टोबर २००१ ते ७ ऑक्टोबर २०२६ या प्रदीर्घ पावणेचोवीस-पंचवीस वर्षांच्या कालखंडात गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे यशस्वी पंतप्रधान असा सामाजिक व राजकीय सेवाप्रवास पूर्ण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवेला अभिवादन करण्यासाठी पिंपळनेर शहरात अत्यंत उत्साहात भव्य ‘सेवा-संकल्प उत्सव’ पार पडला.
पिंपळनेर येथील सुहरी हॉस्पिटल परिसरात भव्यदिव्य रांगोळी आणि शेकडो दिव्यांच्या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. या अनोख्या प्रकाशोत्सवातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील ऐतिहासिक कार्याला उत्स्फूर्त मानवंदना देण्यात आली.
रांगोळीतून साकारली जनकल्याणकारी योजनांची गाथा
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य रांगोळीमध्ये ‘विकसित भारत’ या संकल्पनेसोबतच केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचे सुंदर चित्रण करण्यात आले होते. यात पंतप्रधान उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनधन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, डिजिटल इंडिया, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात घडून आलेल्या सकारात्मक बदलांचा संदेश अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला.
शेकडो दिव्यांनी उजळला परिसराचा कोपरा अन् कोपरा
या विशेष कार्यक्रमाला पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. डॉ. योगिताताई चौरे आणि डॉ. जितेश चौरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुहरी हॉस्पिटलच्या प्रांगणात एकाच वेळी प्रज्वलित करण्यात आलेल्या शेकडो दिव्यांमुळे संपूर्ण परिसर तेजोमय झाला. ‘सेवा, विकास आणि राष्ट्रनिर्माण’ या भावनेने आयोजित या उपक्रमात नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘विकसित आणि आत्मनिर्भर भारता’चा निर्धार
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून सुरू झालेली पंतप्रधान मोदींची वाटचाल आज देशाला जागतिक पटलावर नव्या शिखरावर घेऊन गेली आहे. डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य सुधारणा, आर्थिक समावेशन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत झालेली प्रगती या प्रसंगी अधोरेखित करण्यात आली. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राला अनुसरून भारताला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाला सर्वांनी बळ दिले.
उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक सेवेचा गौरव करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेची अखंड ऊर्जा लाभावी अशा मनापासून सदिच्छा व्यक्त केल्या.
रांगोळीतील विविध रंग, दिव्यांचा लखलखाट आणि नागरिकांच्या उत्साही उपस्थितीमुळे पिंपळनेरमधील हा ‘सेवा-संकल्प उत्सव’ अत्यंत दिमाखदार आणि स्मरणीय ठरला.



Post a Comment
0 Comments