पिंपळनेर (अनिल बोराडे, सहसंपादक):
वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाला आळा घालण्यासाठी आणि मानव व निसर्गात सहजीवनाची नवी वाट निर्माण करण्यासाठी पिंपळनेर (प्रा.) वनक्षेत्राच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. वनविभागाच्या विशेष ‘प्रसिद्धी रथा’द्वारे गावोगावी जाऊन वन्यजीवांबाबत प्रबोधन केले जात असून, या अभियानाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
प्रसिद्धी रथातून गावोगावी प्रबोधन
या मोहिमेदरम्यान वनकर्मचाऱ्यांकडून वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास, जैवविविधतेचे महत्त्व आणि मानव-वन्यजीव संघर्षाची कारणे व त्यावरील उपायांची माहिती दिली जात आहे. वन्यजीवांना घाबरून न जाता त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे आवश्यक आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार या रथाद्वारे रुजवला जात आहे.
श्रमदानातून वनराई बंधारा: पाण्याचे महत्त्व अधोरेखित
जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात. ही समस्या लक्षात घेऊन वनक्षेत्रात श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. यामुळे वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
शाळांमध्ये जैवविविधतेचे धडे व विविध स्पर्धा
बल्हाणे, मोहगाव, चरणमाळ आणि वंजारकुडी येथील शाळांमध्ये वनकर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना निसर्ग संवर्धनाचे धडे दिले. या प्रसंगी आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षणाचा संदेश देणाऱ्या आकर्षक कलाकृती साकारल्या. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
हा संपूर्ण उपक्रम धुळे वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक श्री. मो. बा. नाईकवाडी, विभागीय दक्षता अधिकारी श्री. राजेंद्र सदगीर आणि सहायक वनसंरक्षक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
पिंपळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या नेतृत्वाखाली वनपाल (आर. एस. मोरे, डी. एन. सोनवणे, आर. व्ही. चौरे, डी. बी. महाले) आणि वनरक्षक (जी. एस. बारीस, डी. बी. देसाई, पी. जी. जेलेवाड, ए. एम. घरटे, एस. ई. ठाकरे, व्ही. एस. माळी, आय. बी. पावरा, एस. सी. पावरा, एम. एम. वळवी, डी. एल. राठोड, एस. पी. पावरा, ए. बी. पदमोर, ए. बी. पावरा, टी. के. चौरे, जे. आर. भोई, आर. बी. माळचे, राकेश पावरा) तसेच वनमजूर (बाजीराव पवार व मधुकर कुवर) यांनी या मोहिमेत मोलाचे योगदान दिले.
'संघर्ष नव्हे, सहजीवन!'
जंगल टिकले तरच वन्यजीव टिकतील आणि पर्यावरणाचा समतोल कायम राहील. त्यामुळे वन्यजीवांबद्दलचे गैरसमज दूर करून ‘संघर्ष नव्हे, सहजीवन’ ही संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी पिंपळनेर वनविभागाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.



Post a Comment
0 Comments