निजामपूर (सहसंपादक: अनिल बोराडे):
माळमाथा परिसरातील प्रलंबित विकासकामांचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. "४० वर्षे वाट पाहिली, आता आश्वासन नको; प्रत्यक्ष काम हवे!" अशी आक्रमक भूमिका घेत वासखेडीकरांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. तब्बल चार दशकांपासून रखडलेला वासखेडी–खुडाणे रस्ता, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आणि मूलभूत नागरी सुविधांसह आठ प्रमुख मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन; उपोषण तात्पुरते स्थगित
प्रहार संघटनेचे नेते तथा वासखेडीचे माजी उपसरपंच दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलनाची तीव्रता पाहून अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली. आमदारांचे लोकप्रतिनिधी अजय सोनवणे आणि नायब तहसीलदार कोठावदे रावसाहेब यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
वासखेडीकरांच्या ८ प्रमुख मागण्या:
* वासखेडी–खुडाणे रस्ता: ४० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.
* मूलभूत नागरी सुविधा: परिसरातील गटारी व डिव्हायडरची कामे तत्काळ करण्यात यावीत.
* शेतकरी वीजप्रश्न: शेतकऱ्यांना कायमस्वरूपी व नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
* युवकांसाठी सुविधा: गावातील तरुणांसाठी अद्ययावत व्यायामशाळा व वाचनालय सुरू करावे.
* शैक्षणिक फी माफी: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी पूर्णतः माफ करावी.
* पोलीस वसाहत दुरुस्ती: निजामपूर पोलीस वसाहतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
* भजनी मंडळास मदत: गावातील भजनी मंडळाला आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे.
* स्थानिक रोजगार: वासखेडी सबस्टेशनमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी द्याव्यात.
राजकीय मतभेद बाजूला; संपूर्ण गाव मैदानात
या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वासखेडीकरांनी दाखवलेली अभूतपूर्व एकजूट. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, तरुण आणि विविध क्षेत्रांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यामुळे हे आंदोलन केवळ एका संघटनेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावच्या हक्काचा सामूहिक लढा बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.
काम सुरू न झाल्यास थेट 'रास्ता रोको'चा इशारा
लेखी आश्वासन मिळाले असले तरी ग्रामस्थांचा विश्वास आता केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष कामावर आहे.
> "आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही, तर प्रशासनाला काम करण्याची एक संधी दिली आहे. दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर प्रहार संघटना आणि ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र 'रास्ता रोको' आंदोलन करतील,"
दीपक जाधव (माजी उपसरपंच, वासखेडी)
प्रशासनाची कसोटी!
चार दशकांचा संयम संपल्यानंतर आता वासखेडीकरांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे संपूर्ण माळमाथा परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.


Post a Comment
0 Comments