नवापूर (प्रतिनिधी):
आगामी ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव हे सण नवापूर शहरात शांततेत, उत्साहात आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरे व्हावेत, या उद्देशाने नवापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षपद डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी भूषविले.
बैठकीला पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील, नायब तहसीलदार कुलकर्णी रावसाहेब आणि तालुका वीज अभियंता शेख साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, तसेच मीडिया व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
बैठकीदरम्यान येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरी समस्यांवर व शांतता व्यवस्थेवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्व मंडळांनी एकाच मार्गाने (एक मार्ग) जाण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि रस्त्यांवर लोमकणाऱ्या तारांचा धोका यावर गांभीर्याने चर्चा झाली. याशिवाय रांगोळी मिश्रित गुलालाचा वापर, शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून मार्ग सुकर करणे यावर भर देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या दृष्टीने रंगावली नदीपात्रात दोन ठिकाणी आणि नगरपालिकेच्या हद्दीतील खदानात विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्याबाबत नियोजन ठरवण्यात आले.
यावेळी नगरपालिकेच्या वतीने समाजहित देखावा सादर करणाऱ्या मंडळांना पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात भरत गावित यांनी उपस्थितांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांना व समस्यांना सविस्तर उत्तरे देऊन योग्य ते समाधान केले.
सदर बैठकीचे नेटके सूत्रसंचालन गोपाळ अहिराव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे यांनी मानले. दोन्ही सण शांततेत आणि गुण्यागोविंदाने साजरे करण्याचे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


Post a Comment
0 Comments