Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळे येथे पद्मश्री डॉ. दादा लाड यांचा भव्य सत्कार; ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञाना’चे शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर

 शेतकरी संघटित झाल्याशिवाय उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळणार नाही : पद्मश्री डॉ. दादा लाड

पिंपळनेर (सहसंपादक अनिल बोराडे):

“शेतकरी संघटित झाल्याशिवाय शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी आणायची असेल, तर शेतकऱ्यांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे,” असा स्पष्ट आणि खणखणीत संदेश भारतीय किसान संघाचे पद्मश्री डॉ. श्रीरंग देवबा लाड (दादा लाड) यांनी दिला.



धुळे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय किसान संघ (धुळे जिल्हा) आणि डॉ. दादा लाड गौरव समितीच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी हितासाठी आयुष्य समर्पित करणारे आणि शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष प्रयोग व संशोधन करणारे पद्मश्री डॉ. दादा लाड यांचा या कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला. उपस्थितांच्या हस्तकौतुकात त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

एकाच वर्षात तीन मोठे बहुमान!

डॉ. दादा लाड यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय कार्याची दखल घेत एकाच वर्षात त्यांना तीन महत्त्वाचे सन्मान प्राप्त झाले आहेत:

 * महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

 * परभणी कृषी विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी

 * केंद्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मश्री'

प्रमुख उपस्थिती व संयोजन

या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सीताराम चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा संघचालक हितेंद्र जैन, प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबरावचंद जैन उपस्थित होते.

कार्यक्रमास धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांतून भारतीय किसान संघाचे शेतकरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून ४० शेतकऱ्यांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.

“शेतकरी हा देशाचा कणा; कष्टाला योग्य भाव मिळायलाच हवा”

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पद्मश्री डॉ. दादा लाड यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या वास्तव परिस्थितीवर थेट भाष्य केले. ते म्हणाले, “भारतीय शेतकरी खरोखरच भाग्यशाली आहे. आपल्या देशासारखी सुपीक माती आणि मुबलक पाणी जगातील इतर कोणत्याही देशात क्वचितच आढळते. देशातील सुमारे ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा आधार असलेल्या शेतकऱ्यालाच आज अनेक बिकट अडचणींना सामोरे जावे लागत आहे.”

ते पुढे म्हणाले, “या परिस्थितीत बदल घडवून आणायचा असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शेतकरी संघटित झाल्याशिवाय शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिगरराजकीय संघटना असलेल्या 'भारतीय किसान संघा'चे सदस्य होऊन संघटित व्हावे.”

‘दादा लाड कापूस तंत्रज्ञाना’चे प्रात्यक्षिक

डॉ. दादा लाड यांनी स्वतः संशोधनातून विकसित केलेल्या अत्यंत प्रभावी ‘दादा लाड कापूस तंत्रज्ञाना’चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसमोर करून दाखविण्यात आले. केवळ व्यासपीठावरून भाषणे न देता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर संशोधन पोहोचविण्याचा त्यांचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला.

सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सन्मानपत्राचे वाचन प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी केले. प्रास्ताविक भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबरावचंद जैन यांनी मांडले, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सुरेश अहिरे यांनी करून दिला.

यावेळी साक्री तालुकाध्यक्ष ए. पी. दशपुते, शिरपूर तालुकाध्यक्ष रितेश पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष रणवीर पाटील तसेच जी. व्ही. पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप मधुकर वाघ यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

Post a Comment

0 Comments