सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, दि. १८ ऑगस्ट २०२६ : ईद-ए-मिलाद २०२६ सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे पोलिसांनी मिरवणूक आयोजक, सहभागी तसेच नागरिकांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा व मुस्लिम बांधव पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर या सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) हा सण दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक, धार्मिक कार्यक्रम, तकरीर, दावत-ए-आम आदी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजेपासून दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.
मिरवणुकीसाठी महत्त्वाच्या सूचना
मिरवणूक काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून, मिरवणुकीदरम्यान धार्मिक भावना दुखावतील अशा घोषणा, भाषण किंवा कृत्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी इतर धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मिरवणुकीच्या मार्गावर इतर व्यक्ती किंवा लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने मिरवणूक काढता येणार नाही. पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गात कोणताही बदल करण्यापूर्वी संबंधित पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.
मिरवणुकीमध्ये झेंडे फिरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाइप किंवा लाकडी दांड्यांची लांबी चार फुटांपेक्षा अधिक नसावी, अशी सूचना देण्यात आली आहे. या दांड्यांचा वापर करून कोणाला दुखापत होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मिरवणुकीत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक किंवा साऊंड सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, ध्वनिक्षेपक वाद्ये, गाणी, ढोल, ताशे, झांज आणि बँजो यांचा वापर करताना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आहेत. मिरवणुकीत डीजे वापरण्यास बंदी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
धार्मिक भावना दुखावतील किंवा कोणत्याही धर्माच्या श्रद्धेला बाधा पोहोचेल, अशा प्रकारची गाणी, भाषणे अथवा घोषणा करून धार्मिक तेढ निर्माण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मिरवणुकीमध्ये सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा इतर कोणत्याही प्रकारची शस्त्रे अथवा दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास प्रतिबंध आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान दगड किंवा इतर वस्तू फेकण्यासही मनाई करण्यात आली आहे.
या सर्व सूचनांचे पालन करून ईद-ए-मिलादचा सण शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन धुळे पोलिसांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments