सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर:पिंपळनेर नगरपरिषद पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना वार्ड क्रमांक १ मध्ये सार्वजनिक निधीतून बोरिंगचे काम करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आचारसंहितेचे सरळ-सरळ उल्लंघन करून हे काम करण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषी अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पिंपळनेरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ च्या पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशांनुसार आणि नगरपरिषदेच्या नियमांनुसार, निवडणूक काळात संबंधित प्रभागासह त्याच्या लगतच्या इतर प्रभागांमध्येही कोणत्याही प्रकारची नवीन सार्वजनिक किंवा शासकीय विकासकामे सुरू करण्यास कायदेशीर मनाई असते. असे असतानाही सर्व नियम पायदळी तुडवत रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी वार्ड क्रमांक १ मध्ये सर्रासपणे बोरिंगचे काम करण्यात आल्याचे पुरावे समोर आले आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासकीय निधीतून अशा प्रकारे नवीन काम सुरू करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, असा तीव्र संशय आता व्यक्त केला जात आहे.
या गंभीर प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देताना गटनेते तथा नगरसेवक ॲड. ज्ञानेश्वर एखंडे, नगरसेवक विजय गांगुर्डे, नगरसेवक गणेश खैरनार, नगरसेवक सौ. शोभाताई नेरकर, नगरसेवक प्रशांत सूर्यवंशी, नगरसेवक संभाजी अहिरराव, उमेर पठाण यांच्यासह शिंदे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामाची सखोल चौकशी करावी, कामाला मंजुरी देणारे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असेही यात नमूद केले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जाहीरपणे झालेल्या या कथित कामामुळे नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत असून "प्रशासनाने आचारसंहिता पायदळी तुडवली का?" असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक निधीचा असा गैरवापर करणाऱ्या दोषींवर निवडणूक प्रशासन आता काय आणि कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण पिंपळनेर शहराचे लक्ष लागून राहिले आहे.


Post a Comment
0 Comments