नवापूर (प्रतिनिधी):
तालुक्यातील कोठडा ग्रामपंचायत हद्दीतील पशुधनासाठी राखीव असलेली 'गुरचरण' जमीन एमआयडीसीसाठी (MIDC) हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोठडा ग्रामस्थांनी दिला आहे.
कोठडा ग्रामपंचायत क्षेत्रातील गट क्र. २३, ४६ आणि ४७ ही जमीन पूर्वापार गायरान म्हणून राखीव आहे. या जमिनीवर कोठडा आणि परिसरातील पाड्यांमधील हजारो पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र, २०११-१२ च्या दरम्यान ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी किंवा 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) न घेता, एमआयडीसी प्रशासनाने या जमिनीवर स्वतःचे नाव लावले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही जमीन पेसा (PESA) कायद्यांतर्गत येत असून ग्रामसभेचा या हस्तांतरणास पूर्णपणे विरोध आहे.
या जमिनीवर ग्रामस्थांची सार्वजनिक स्मशानभूमी, पाझर तलाव, सरकारी नळपाणी पुरवठा योजना आणि वृक्षारोपणाचे प्रकल्प अस्तित्वात आहेत. जर ही जमीन एमआयडीसीला दिली गेली, तर आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
निवेदन देतेवेळी माजी सरपंच सौ. सुरेखा दिलीप कोकणी, उपसरपंच विरसिंग भोंगड्या कोकणी, सुरेश गावीत, राहुल गावीत, वेकर कोकणी, अमरसिंग गावीत यांच्यासह कोठडा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. "आमच्या हक्काची गुरचरण जमीन वाचवण्यासाठी आम्ही कायदेशीर लढा देऊ आणि न्याय न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी आंदोलन करू," असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Post a Comment
0 Comments