प्रतिनिधी गणेश सोनवणे
सटाणा
मुलाच्या शाळेतील पालक मेळाव्यासाठी अत्यंत उत्साहात निघालेल्या विसरवाडी येथील एका दाम्पत्याचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बागलाण तालुक्यातील ढोलबारे शिवारात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संदीप गावित (३५) आणि आशा गावित (३२) या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे विसरवाडी आणि नवापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील रहिवासी असलेले संदीप गावित हे स्थानिक १३२ केव्ही उपकेंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा येवला येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यासाठी संदीप गावित हे पत्नी आशा यांच्यासह मोटरसायकलने विसरवाडीहून येवल्याच्या दिशेने जात होते.
दुपारच्या सुमारास त्यांची दुचाकी बागलाण तालुक्यातील ढोलबारे परिसरात आली असता, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची ओळख
* संदीप गावित (वय ३५): रा. आमलीपाडा, ता. विसरवाडी, ता. नवापूर (सुरक्षा रक्षक, १३२ केव्ही उपकेंद्र).
* आशा संदीप गावित (वय ३२): रा. आमलीपाडा, ता. विसरवाडी.
पोलीस प्रशासनाची धाव
अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी निंबा खैरनार व गणेश गरुड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कल्पेश निकम व चंद्रकांत देवरे यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
परिसरात हळहळ आणि संताप
संदीप गावित हे आपल्या कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू स्वभावासाठी परिसरात परिचित होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

Post a Comment
0 Comments