सहसंपादक अनिल बोराडे
धुळे: शिरसोले (ता. साक्री, जि. धुळे) येथील आदर्श प्रगतिशील शेतकरी पंडितराव पाटील यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला आहे.
कल्याण येथील सम्राट अशोक शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांचे ते वडील होत.
संघर्षमय आणि आदर्श प्रवास
पंडितराव पाटील हे एक गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले असले तरी त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले. स्वतःच्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी दोन्ही मुलांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले आणि त्यांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या प्रयत्नांतून त्यांचा एक मुलगा डॉक्टर आणि दुसरा मुलगा मुख्याध्यापक बनला. तसेच, नातवंडे ध्रुवज, सलोनी, अमृता यांनीही डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्याचा आनंद त्यांनी अनुभवला. शेतीत आदर्श निर्माण करत त्यांनी आपल्या कुटुंबाला दिलेले हे संस्कार आणि शिक्षणामुळे त्यांचा प्रवास "आनंददायी प्रवास" आणि परिसरात "आदर्श शेतकरी" म्हणून ओळखला जात होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे आणि मुलगी-जावई असा मोठा परिवार आहे. एका आदर्श व्यक्तिमत्त्वाची एक्झिट वयोमानानुसार अल्पशा आजाराने झाल्याने शिरसोले परिसरावर शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दशक्रिया विधी: गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पंडितराव पाटील यांच्या मूळ गावी, शिरसोले (ता. साक्री, जि. धुळे) येथे होणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
Post a Comment
0 Comments