Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर नगर परिषदेची पहिली निवडणूक: आरक्षणाने बदलले राजकीय समीकरण, इच्छुकांचा हिरमोड

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर (प्रतिनिधी): पिंपळनेर ग्रामपंचायतीला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत अनुसूचित जमातीच्या (ST) महिला प्रवर्गासाठी निघाल्याने शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. पहिल्या नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक इच्छुकांचा या आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे.

पिंपळनेरला नगर परिषद मंजूर करून आणण्यात आमदार सौ. मंजुळाताई गावित यांचे मोठे प्रयत्न होते. पहिल्या नगराध्यक्षपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र, आरक्षणाचा 'गुंगरू' एसटी महिला प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने आता सर्व गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत.



पहिल्या नगरसेवकासाठी चुरस

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत बदल झाले असले तरी, पहिल्या नगरपरिषदेचे नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी धडपड सुरू आहे. अनेकांनी आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट शिवसेना (ऊबाठा) हे प्रमुख पक्ष आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत.

आमदार मंजुळाताई गावित आणि धुळे जिल्हा शिवसेनाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित हे निवडणुकीत सक्रिय राहतील. भाजपा देखील स्वतंत्र उमेदवार देण्याच्या विचारात आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसही काही जागांवर नशीब आजमावणार आहे.

'तिसरी आघाडी' देणार आव्हान

पक्षीय राजकारणासोबतच, 'पिंपळनेर शहर विकास आघाडी' या नावाने एक तिसरी आघाडी देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे. ज्यांना प्रमुख पक्षांकडून तिकीट मिळणार नाही, असे नाराज आणि सक्षम उमेदवार या आघाडीमार्फत निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक प्रभागांमध्ये पक्षाचा विचार न करता 'एकला चलो रे' चा नारा देत वैयक्तिक उमेदवारी करणारे उमेदवारही कमी नाहीत.

युतीचे गणित आणि जनतेचा कौल महत्त्वाचा

सध्या राजकीय वर्तुळात शिंदे गट शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होणार का? आणि युती झाल्यास जागावाटपाचे सूत्र काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीत काम केले आहे, त्यांनाच जनता पुन्हा नगरसेवक म्हणून स्वीकारते की नवीन चेहऱ्यांना संधी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'लक्ष्मी'चा वापर ठरणार निर्णायक

पिंपळनेर नगर परिषदेची ही पहिली निवडणूक असल्याने ती अतिशय रंगतदार होणार यात शंका नाही. आरक्षणाने नगराध्यक्षपदाचे समीकरण बदलले असले तरी, नगरसेवकपदाच्या निवडणुकीत आर्थिक कारण देखील महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीत कोणता उमेदवार किती 'लक्ष्मी'चा वापर करतो, यावरही निवडणुकीचे भविष्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.

आरक्षणामुळे ओबीसी किंवा ओपन नगराध्यक्षपदाची आशा बाळगणाऱ्या शहरातील जनतेचा हिरमोड झाला असला तरी, आता कार्यकर्ते पक्षात एकजुटीने प्रचार करतात की 'पाय खेचण्याचे' राजकारण करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्यांना पक्षाचे तिकीट मिळणार नाही, ते बंडखोरी करतात की तिसऱ्या आघाडीचा हात पकडतात, हे येणारा काळच ठरवेल.

टीप: पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Post a Comment

0 Comments