सहसंपादक अनिल बोराडे
साक्री: साक्री तालुक्यातील देवळीपाडा येथील प्राथमिक अनुदानित आश्रमशाळेत एका ९ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
देवळीपाडा आश्रमशाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी मंजुळा राजू पवार (वय ९) ही विद्यार्थिनी ११ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तात्काळ टेंभा उपकेंद्रात आणि नंतर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मंजुळाचा मृतदेह पुढील तपासणीसाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. तिथे शवविच्छेदन (PM) करण्यात आले आहे. सध्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
आदिवासी संघटनांची पाहणी आणि प्रशासनावर आरोप
या घटनेची माहिती मिळताच १३ सप्टेंबर रोजी जय आदिवासी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. या शिष्टमंडळात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विशाल ठाकरे, अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव गमन भाऊ बागुल, उपाध्यक्ष रवींद्र मालचे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आणि प्रशासनाशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आश्रमशाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एकाच आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना असून, आश्रमशाळेचे संचालक आणि प्रशासन आदिवासी मुलांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे," असे त्यांनी सांगितले.
आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी नाशिक आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Post a Comment
0 Comments