संपादकीय
नंदुरबार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि रील्स स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक जितेंद्र खवळे यांच्या डॉक्युमेंटरीला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, तसेच सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अरुण नलावडे, अभिनेत्री देविका दप्तरदार, प्रभाकर मोरे, मिलिंद दस्ताने आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक व चित्रपट विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
जितेंद्र खवळे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हां मै शर्मिन हू' या माहितीपटाला या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. नंदुरबारच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या जितेंद्र खवळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी नंदुरबारचे डॉ. खुशाल राजपूत, अभिनेते विजय माळवे आणि धुळ्याचे भटू चौधरी हेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. जितेंद्र खवळे यांच्या या यशाने नंदुरबार जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Post a Comment
0 Comments