Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेरमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा: हिंदी साहित्याच्या योगदानावर पोस्टर प्रदर्शन

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर: हिंदी साहित्याने भाषेचा विकास साधत विविध भावना आणि सामाजिक स्थितींचे चित्रण करून हिंदीला समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती एस.एस.पवार यांनी केले. मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने आयोजित केलेल्या हिंदी दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.



हिंदी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, कवी कबीर, तुलसीदास, सूरदास, महादेवी वर्मा, सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' आणि हरिवंशराय बच्चन यांच्या साहित्यातील योगदानावर आधारित पोस्टर प्रदर्शन आणि एन.एस.एस.च्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी बोलताना प्राचार्या एस.एस.पवार यांनी विद्यार्थ्यांना हिंदी साहित्याच्या महान लेखकांचा आणि कवींचा परिचय करून देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, हिंदी कवी आणि लेखकांनी त्यांच्या साहित्यकृतीतून भाषेचा विकास साधला आणि सामाजिक जाणिवेला एक नवी दिशा दिली.

या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक कुणाल गांगुर्डे, पर्यवेक्षक दिपक कुंवर, बी.एड्. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील आणि प्रा. श्रीमती टी.जे.साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेतील विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थिनींनीही आपले विचार व्यक्त केले.

 * गायत्री दशपुते हिने कबीर, तुलसीदास आणि सूरदास यांच्या दोहे आणि भजनांनी धार्मिक व सामाजिक विचार प्रभावीपणे मांडल्याचे सांगितले.

 * योगिता ठाकरे हिने महादेवी वर्मा यांच्या योगदानामुळे हिंदी कवितेवर पडलेला प्रभाव स्पष्ट केला.

 * दामिनी सोनवणे हिने सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' यांना छायावादी युगाचे प्रमुख स्तंभ मानले जाते आणि त्यांनी हिंदी कवितेला नवीन दिशा दिल्याचे सांगितले.

 * पूजा नरवाडे हिने गुलजार आणि गीत चतुर्वेदींसारख्या आधुनिक कवींनी हिंदी साहित्यात आपले स्थान निर्माण केल्याचे सांगितले.

 * सीमा जाधव हिने माखनलाल चतुर्वेदी यांच्या 'पुष्प की अभिलाषा' या कवितेची माहिती दिली.

प्रा. श्रीमती टी.जे.साळवे यांनी हिंदी साहित्यातील पद्य आणि गद्य दोन्ही प्रकारांतील महत्त्वाच्या रचनांची माहिती दिली. हिंदी साहित्याचा पाया प्राचीन संस्कृत भाषेत असूनही, मध्ययुगीन काळात अवधी, मागधी, अर्धमागधी यांसारख्या लोकभाषांनी तो विकसित केल्याचे विद्यार्थिनी निकिता भवरेंनी सांगितले. मैथिली शरण गुप्त यांच्या 'साकेत' या महाकाव्याने हिंदी साहित्याला समृद्ध केल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश्वरी सूर्यवंशी यांनी केले, तर सूत्रसंचालन गायत्री दशपुते हिने केले. चेतना सावंत हिने उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments