सहसंपादक अनिल बोराडे
त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याचा पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.
नेमकी घटना काय?
झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने हे तीन पत्रकार त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये वार्तांकनासाठी गेले होते. त्यावेळी पार्किंगवर काम करणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर दगड, लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात तिन्ही पत्रकार जखमी झाले आहेत.
पत्रकार संघटनेचा निषेध आणि मागणी
या हल्ल्यानंतर पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेने तात्काळ निषेध व्यक्त केला. पत्रकारांवरील वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहेत. पत्रकार हे समाजासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करतात. अशाप्रकारे गुंड प्रवृत्तीने पत्रकारांवर केलेले हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असे संघटनेने स्पष्ट केले.
या घटनेचा निषेध करत, पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. यात संबंधित गुंडांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.
या निवेदनावेळी पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रा. शिवप्रसाद शेवाळे, उपाध्यक्ष प्रा. एस. डी. पाटील, चंद्रकांत घरटे, सचिव भरत बागुल, ज्येष्ठ मार्गदर्शक भिलाजी जिरे, ई-मीडिया प्रमुख अनिल बोराडे, संपर्क प्रमुख दिलीप बोळे, रविंद्र खैरनार,रवींद्र मराठे, कोषाध्यक्ष विशाल बेनुस्कर, अंबादास बेनुस्कर, हरीष जगताप, शाकीर सैय्यद, गणेश गावित, संजय बच्छाव, सद्दाम पटेल आणि अमोल पाटील उपस्थित होते.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments