सहसंपादक अनिल बोराडे
मळगाव (धुळे): मळगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महिला विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मळगाव येथील ७० महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. सरपंच किरण बागुल आणि त्यांच्या पत्नी सौ. कल्पना किरण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना छोटे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. यशोदाबाई भामरे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, दसवेल यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब शांताराम भामरे आणि सचिव प्रतिभाताई भामरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शिवणकाम प्रशिक्षण शक्य झाले आहे.
हे प्रशिक्षण एकूण १५ दिवसांचे असून, यात महिलांना चार वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज शिवण्याचे तंत्र शिकवले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण केवळ मळगाव पुरते मर्यादित नसून, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डोंगरपाडा आणि सावरीमाळ या महसुली गावांमध्येही प्रत्येकी १५ दिवसांसाठी आयोजित केले जाणार आहे.
या उपक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी रतिलाल पवार साहेब, आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेरचे प्रतिनिधी विजय ज्ञानेश, इसाक ठिगळे, एस्तर कुवर, आणि सुनीता मावची यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षणातून महिलांना नवीन कौशल्य शिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे.
Post a Comment
0 Comments