सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: दहावी आणि बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्यावर त्यांच्या पुढील उज्वल भविष्याची पायाभरणी अवलंबून असते. आजच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी, परीक्षांचे दडपण न घेता आत्मविश्वासाने सामोरे जाणे आवश्यक आहे. दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे मृगजळाचे पाणी नाही, तर कठोर परिश्रमानंतर मिळणारे यश आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य एस.डी. पाटील यांनी केले.
पिंपळनेर येथील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'समुपदेशन काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले.
करिअर निवडताना योग्य मार्गदर्शन आवश्यक
प्राचार्य पाटील म्हणाले की, नकार पचवण्याची क्षमता कमी असलेल्या मुलांना समुपदेशनाची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, अभियोग्यता आणि आवड पाहून योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात कुटुंबात मुलांच्या समस्यांवर चर्चा होत नाही, त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि अनेक तरुण यशापासून दूर राहतात.
ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे
प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, परीक्षेला सामोरे जाण्याआधी आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 'लहान ध्येय बाळगणे हा गुन्हा आहे' या वाक्याचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित केले. दहावी आणि बारावीनंतर अनेक करिअरच्या वाटा उपलब्ध आहेत, त्यांची माहिती तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडून घ्यावी, जेणेकरून भविष्यात पश्चात्तापाची वेळ येणार नाही.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे आद्य संस्थापक कै. मा. खा. रेशमाभाऊ भोये, कै. योगेंद्र भोये, कै. अनिल भोये आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान संचालक रोहित योगेंद्र भोये यांनी भूषविले. यावेळी मुख्याध्यापिका एस.बी. पाटील, पर्यवेक्षक डी.व्ही. सूर्यवंशी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जे.बी. निकम यांनी केले, सूत्रसंचालन एल.पी. कोठावदे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. पी.एम. पवार यांनी केले.
Post a Comment
0 Comments