सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: साक्री तालुक्यातील देवळीपाडा येथील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा झोपेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंजुळा राजू पवार (वय ९, रा. मचमाळ, ता. साक्री) असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देवळीपाडा येथील आश्रमशाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी मंजुळा ही शाळेच्या वसतिगृहात राहत होती. बुधवारी (१० सप्टेंबर, २०२५) रात्री सर्व काही सामान्य होते. रात्री १० वाजता स्त्री अधीक्षिका रंजना चंद्रसिंग पवार यांनी तपासणी केली तेव्हा सर्व विद्यार्थिनी आपापल्या खोल्यांमध्ये झोपल्या होत्या.
गुरुवारी (११ सप्टेंबर, २०२५) सकाळी ५.३० वाजता रंजना पवार नेहमीप्रमाणे विद्यार्थिनींना उठवण्यासाठी गेल्या असता, खोली क्रमांक ६ मध्ये मंजुळा झोपेतून उठत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता, ती कोणतीही हालचाल करत नव्हती. तात्काळ त्यांनी पुरुष अधीक्षक गजेंद्र चौरे आणि प्राथमिक मुख्याध्यापक सुरेश राऊत यांना याची माहिती दिली.
मंजुळाला कोणतीही हालचाल करताना न दिसल्याने तिला तात्काळ टेंभे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. सकाळी ७.५० वाजता मंजुळाला पिंपळनेरच्या रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासणी करून सकाळी ७.५५ वाजता तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती रंजना पवार यांनी तात्काळ मंजुळाच्या कुटुंबियांना दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यासाठी धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment
0 Comments