Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साक्री तालुक्यातील जैताणे येथे अखिल भारतीय माळी महासंघातर्फे ५० गुणवंतांचा गौरव

सहसंपादक अनिल बोराडे 

 निजामपूर: नुकताच साक्री तालुक्यातील जैताणे येथील माळी समाज मंगल कार्यालयात अखिल भारतीय माळी महासंघातर्फे माळी समाजाच्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष व नाशिक विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी भूषविले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या.



कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि जैताणे येथील दिवंगत माजी सरपंच संजय खैरनार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाली.

याप्रसंगी बोलताना वासुदेव देवरे यांनी समाजाच्या गुणात्मक विकासावर भर दिला. ते म्हणाले, "समाजाचा केवळ संख्यात्मक विकास पुरेसा नाही, तर गुणात्मक विकासही तेवढाच महत्त्वाचा आहे. समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन मिळाल्यासच समाजाची प्रगती होईल."

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर, मेडिकल, इंजिनिअरिंग, नेट, सेट, पीएचडी, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याशिवाय, कला, क्रीडा, संगीत, उद्योग, शिक्षण, पोलीस आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, तसेच आजी-माजी सैनिकांचाही विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे या सर्व गुणवंतांना फाईल, फोल्डर आणि सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमात प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करताना वासुदेव देवरे, धुळे जिल्हाध्यक्ष आर.के. माळी आणि पत्रकार रघुवीर खारकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. भगवान जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. काशीनाथ माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भगवान जगदाळे, जैताणे शहराध्यक्ष मनीष संजय खैरनार, धुळे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब माळी आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. अखिल भारतीय माळी महासंघाच्या साक्री आणि पिंपळनेर मंडळांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

यापुढे हा तालुकास्तरीय गुणगौरव कार्यक्रम दरवर्षी साक्री, पिंपळनेर, दहिवेल आणि निजामपूर-जैताणे येथे रोटेशन पद्धतीने आयोजित केला जाईल, असेही या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

0 Comments