सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर (प्रतिनिधी): पिंपळनेर शहर आणि परिसरातील जनतेला गेली १७ वर्षे अविरतपणे आरोग्य सेवा देणारे प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जितेश चौरे यांना पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने 'हृदयनाथ पुरस्कार २०२५' देऊन सन्मानित करण्यात आले. सुहरी हॉस्पिटलच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात डॉ. चौरे यांच्या निःस्वार्थ कार्याचा गौरव करण्यात आला.
'सुहरी हॉस्पिटल'ची १७ वर्षांची यशस्वी वाटचाल
पिंपळनेरमध्ये वैद्यकीय सेवेचा अभाव असताना, ९ सप्टेंबर २००८ रोजी डॉ. जितेश चौरे यांनी 'सुहरी हॉस्पिटल'च्या माध्यमातून आरोग्य सेवेला सुरुवात केली. त्या काळात पिंपळनेर आणि आसपासच्या गावातील रुग्णांना मधुमेह, हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी धुळे, नाशिक, मुंबई किंवा पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. प्रवासाचा मोठा खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असे.
मात्र, पिंपळनेरचे भूमिपुत्र असलेल्या डॉ. जितेश चौरे यांनी वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस, एमडी) पूर्ण केल्यानंतर 'मी माझ्या मातीचे आणि समाजाचे देणे लागतो' या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या गावातच वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरू केलेल्या सुहरी हॉस्पिटलमुळे परिसरातील हजारो रुग्णांना स्थानिक पातळीवरच अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आणि अनेकांचे प्राण वाचले. आज १७ वर्षांनंतरही हे रुग्णालय रुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे.
'हृदयनाथ पुरस्कार' देऊन सन्मान
डॉ. चौरे यांनी गेल्या १७ वर्षांत दिलेली सेवा, त्यांची रुग्णांप्रती असलेली तळमळ आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव लक्षात घेऊन पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे ठरवले. याच अनुषंगाने, सुहरी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना 'हृदयनाथ पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या हस्ते डॉ. चौरे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जगताप यांनी डॉ. चौरे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्यामुळे पिंपळनेरच्या आरोग्य सेवेत क्रांती झाल्याचे मत व्यक्त केले.
या सोहळ्याला पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेचे प्रा. एस.डी. पाटील, प्रा. शिवप्रसाद शेवाळे, भिलाजी जिरे, चंद्रकांत घरटे, दिलीप बोळे, अनिल बोराडे, भरत बागुल, विशाल बेनुस्कर, हरीष जगताप, रवींद्र मराठे, रविकिरण बोरसे, अमोल पाटील सद्दाम पटेल शाकीर सैय्यद संजय बच्छाव गणेश गावीत बाबा बच्छाव यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. चौरे यांच्या या सेवेबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments