सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर:पिंपळनेर येथील कन्या कु. हर्षदा आस्तिकराव शिरवाडकर यांनी नुकत्याच झालेल्या पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक (SET) परीक्षेत गणित विषयात यश मिळवून पिंपळनेर तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
हर्षदा यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळनेर येथील संत ठाकुरसिंह ज्ञानपीठ विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी विद्यानंद हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी सटाणा येथील के.ए.एन्.एम. सोनवणे कॉलेजमधून बी.एस्सी.ची पदवी संपादन केली, तर नाशिक येथील एल.व्ही.एच. पंचवटी कॉलेजमधून गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अध्यापनाची आवड असल्यामुळे त्यांनी लोहणेर (ता. बागलाण) येथील डॉ. डी.एस. आहेर अध्यापक महाविद्यालयातून बी.एड.ची पदवी मिळवली.
या शैक्षणिक प्रवासादरम्यान त्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि अभ्यासाची योग्य दिशा ठेवली. त्यांचे हे यश त्यांच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे. सध्या त्या नाशिक येथील मातोश्री असराबाई पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
हर्षदा ह्या माजी धुळे जिल्हा सरकारी वकील कै. ए.बी. पाटील आणि सेवानिवृत्त शिक्षक कै. सुपडू फुला जिरे यांची नात आहेत. तसेच त्या ॲड. कै. आस्तिकराव शिरवाडकर आणि श्रीमती आशाबाई शिरवाडकर यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे काका ईश्वर शिरवाडकर, आत्या सुनीता शिरवाडकर आणि मामा संजय रायते यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाने पिंपळनेरसह नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment
0 Comments