सहसंपादक अनिल बोराडे
धुळे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, धुळे ग्रामीण जिल्ह्याकडून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा पंधरवडा' आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना श्री. खलाणे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात 'सेवा पंधरवडा' साजरा होत आहे. 'सेवा परमो धर्म' या पंतप्रधानांच्या विचारांना पुढे घेऊन धुळे ग्रामीण जिल्ह्यातही विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, दिव्यांगांचा सन्मान आणि विकसित भारत चित्रकला स्पर्धा यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी आणि प्रबुद्ध संमेलनही या कालावधीत आयोजित केले जाईल. याशिवाय, २५ सप्टेंबर रोजी दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती देखील साजरी केली जाईल.
या 'सेवा पंधरवड्या'साठी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अमरीश पटेल, आमदार काशीराम पावरा आणि आमदार रामदादा भदाणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भाजप किसान मोर्चाच्या वतीने "एक पेड माँ के नाम" हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.
धुळे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व १८ मंडळांमध्ये हे उपक्रम आयोजित केले जातील. अभियान संयोजक शैलेंद्र आजगे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सेवाभावी कार्यक्रम पार पडणार आहेत, असे श्री. खलाणे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वदेशी मूल्यांवर आधारित भारताची प्रगती आज जगाला दिसून येत आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Post a Comment
0 Comments