सहसंपादक अनिल बोराडे
मोहगाव, ता. साक्री - रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वाढता वापर, त्यामुळे नापीक होत असलेल्या जमिनी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर उपाय म्हणून राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दि. १६ सप्टेंबर, २०२५ रोजी मोहगाव येथे गाव पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांना विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता.
प्रमुख मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी श्री योगेश सोनवणे आणि पिंपळनेर मंडळ कृषी अधिकारी श्री प्रमोद गोलाईत यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शविली. श्री. गोलाईत यांनी नैसर्गिक शेतीत तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी मूल्य साखळी कशी विकसित करावी, जेणेकरून शहरी ग्राहकांना विषमुक्त शेतमाल मिळू शकेल, याविषयी सविस्तर माहिती दिली. या मिशनअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांच्या शेताचे प्रमाणीकरण करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, ज्यामुळे त्यांच्या शेतमालाला शाश्वत हमीभाव मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
सेंद्रिय निविष्ठांचे प्रात्यक्षिक
कार्यक्रमात उप कृषी अधिकारी श्री पुंडलिक महाले यांनी उपस्थितांना सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, बिजामृत, पंचामृत आणि बायोडायनॅमिक कंपोस्ट कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकता आले.
उपस्थित मान्यवर व शेतकरी
या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री सर्जेराव अकलाडे यांनी केले. या कार्यक्रमाला मोहगावचे सरपंच लक्ष्मण महाले, चावडीपाडाचे सरपंच रमेश बहिरम, उपसरपंच सुरेश चौरे, पोलीस पाटील राजू गावित, शेंदवडचे सरपंच राजू गावित, कृषी सखी रोमिला बारिश बोवाजी व मंजुळा देसाई, तसेच शेतकरी सविता राजपूत, सोन्या चौरे, सोमनाथ गांगुर्डे, रमेश गावित आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments