सहसंपादक अनिल बोराडे
धुळे जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या योग शिक्षकांनी आपले थकित मानधन मिळावे आणि अचानक बंद झालेली योगसत्रे पुन्हा सुरू करावीत, या मागणीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन दिले आहे. धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
नेमकी मागणी काय?
गेल्या ५-६ वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये योग शिक्षक म्हणून काम करत असलेल्या या शिक्षकांना एप्रिल महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. तसेच, शासनाने कोणतेही ठोस कारण न देता योगसत्रे अचानक बंद केली आहेत. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
समाजासाठी योगदान
या योग शिक्षकांच्या नियमित योगसत्रांमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे. परिणामी, औषधोपचारांवरील सरकारी खर्चही कमी झाला. या कामातून योग शिक्षकांना रोजगार मिळाला आणि योगाचा प्रचार-प्रसारही मोठ्या प्रमाणात झाला. बंद झालेल्या योगसत्रांमुळे योग शिक्षकांचा रोजगार हिरावला गेला असून, यामध्ये विशेषतः गरीब, विधवा आणि परित्यक्ता महिलांची संख्या जास्त आहे.
आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
योग शिक्षकांनी आपल्या निवेदनात या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन योगसत्रे पुन्हा सुरू करावीत आणि थकित मानधनाची तात्काळF1_2 अदा करावी, अशी मागणी केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणात लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
या वेळी मंगला पाटील, मीनाक्षी बारी, शिलू खरे, मनीषा सोनवणे यांच्यासह अनेक योग शिक्षक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments