सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, २० सप्टेंबर २०२५: शिक्षकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, जिल्हा परिषद धुळे अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने १९ सप्टेंबर २०२५ रोजी हिरे भवन, धुळे येथे "आदर्श शिक्षक" आणि "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यात, साक्री तालुक्यातील इंदिरा माध्यमिक मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मांजरी या शाळेने 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' टप्पा-२ अभियानांतर्गत द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
हा प्रतिष्ठित पुरस्कार खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार श्री राघवेंद्र भदाणे, श्री राजेश इंगळे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. मनीष पवार, डॉ. किरण कुंवर, गटशिक्षणाधिकारी आदरणीय पगारे साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली राऊत आणि इतर सहशिक्षकांना प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल बोलताना, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली राऊत आणि संस्थाचालक व मार्गदर्शक श्रीमती यमुनाबाई राऊत यांनी समाधान व्यक्त केले. "शाळेच्या स्थापनेपासून आम्ही जे निस्वार्थपणे कार्य करत आहोत, त्याची दखल आज योग्य व्यासपीठावर घेतली गेली," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी या यशाचे श्रेय साक्री तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पगारे साहेब यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाला, तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अखंड मेहनतीला दिले.
या शाळेच्या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार मांजरी गावासाठी अभिमानास्पद क्षण असून, यामुळे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या इतरांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.
Post a Comment
0 Comments