सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) आणि संत निरंकारी मंडळ, पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलै रोजी 'मानव एकता दिनानिमित्त' पिंपळनेर येथील महावीर भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ७५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे झोनल इन्चार्ज हिरालालजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. ज्ञानेश्वर एखंडे, पिंपळनेरचे नायब तहसीलदार बहिरम, पिंपळनेरचे माजी सरपंच योगेश नेरकर, राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष संभाजी अहिराव, राजस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सुभाष जैन, निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर शाखेचे मुखी जगदीश ओझरकर, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सुवर्णा आजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संत निरंकारी मंडळातर्फे दरवर्षी 'मानव एकता दिनानिमित्त' जगभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. याच परंपरेनुसार, पिंपळनेर येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅलीचे आयोजन
रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी पूर्वसंध्येला पिंपळनेर शहरातून जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यात्मिक जागृतीसोबत समाजसेवेचा संदेश
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना हिरालालजी पाटील यांनी निरंकारी मंडळामार्फत संपूर्ण जगभरात सुरू असलेल्या आध्यात्मिक जागृतीसोबत विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. जगदीश ओझरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विलास जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कल्पना शेवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
धुळे येथील शासकीय रक्तपेढीचे डॉक्टर तेजस पाटील, डॉक्टर शीतल शेवाळे आणि त्यांच्या पथकाने रक्त संकलनाचे कार्य केले. संत निरंकारी मंडळाचे सेवादल बंधू-भगिनी आणि साध संगतच्या सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments