सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार, १ जुलै: आज, १ जुलै, नंदुरबार जिल्ह्याचा २७ वा वर्धापनदिन. जिल्ह्याच्या निर्मिती होऊन जरी २७ वर्षे झाली असली, तरी या भूमीला समृद्ध इतिहास लाभला आहे. याच इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि दूरदृष्टीने एक वेगळा ठसा उमटवणारे कै. रामभाऊ जगन पाटील यांचा आज २६ वा स्मृतिदिन. सुमारे ८० वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अशक्यप्राय वाटत होत्या, त्या त्यांनी आपल्या ध्येयवादाने आणि जिद्दीने शक्य करून दाखवल्या. नंदुरबारमध्ये छायाचित्रण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय निर्विवादपणे कै. रामभाऊ पाटील यांनाच जाते.
रामभाऊ पाटील, ज्यांना आप्तेष्ट आणि व्यावसायिक वर्तुळात आदराने 'दादा' म्हणून ओळखले जात असे, त्यांनी १९३२ साली छायाचित्रण क्षेत्रात पदार्पण केले. केवळ पैसा कमावणे हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, तर जीवनातील प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करून त्याला कलात्मकतेच्या सर्वोच्च पातळीवर नेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या स्टुडिओला, 'पाटील फोटो', त्या काळात केवळ एक छायाचित्रण केंद्र म्हणून नव्हे, तर छायाचित्रण क्षेत्रातील एक परवलीचा शब्द म्हणून ओळखले जात असे. आजही नंदुरबारमधील अनेक जुन्या घरांमध्ये रामभाऊ पाटलांनी काढलेले फोटो अभिमानाने जपले जातात.
आजच्या अत्याधुनिक युगात कल्पनाही करता येणार नाहीत अशा साधनांच्या कमतरतेतही त्यांनी काढलेली छायाचित्रे पाहून आजही 'वाह क्या बात है' असे उद्गार सहजच बाहेर पडतात. त्यांच्या प्रत्येक फोटोला एक खास 'दादा टच' असे. त्यांच्या छायाचित्रणाच्या वाटचालीतील एक हृदयस्पर्शी आठवण म्हणजे त्यांनी आदिवासी समाजात आदराचे स्थान मिळवलेल्या गुलाम महाराजांचा काढलेला फोटो. जेव्हा छायाचित्रण केवळ उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी मानली जात होती, तेव्हा दादांनी गुलाम महाराजांची छबी आपल्या कॅमेऱ्यात बंदीस्त केली. हा गुलाम महाराजांचा कदाचित पहिला आणि शेवटचा फोटो आजही दादांचे नातू, प्रसिद्ध वृत्तपत्र छायाचित्रकार नितीन पाटील यांच्याकडे जतन केलेला आहे. आजही आदिवासी बांधव गुलाम महाराजांच्या फोटोसाठी नितीन पाटलांकडे येतात आणि गुलाम महाराजांच्या स्मृतिदिनी पूजला जाणारा फोटोही दादांनीच काढलेला आहे, हे ऐकून प्रत्येकजण नतमस्तक होतो.
छायाचित्रणाव्यतिरिक्त दादांना शिकारीचा प्रचंड नाद होता. त्यासाठी त्यांनी ब्रिटिश काळात बंदुकीचा परवानाही मिळवला होता आणि सातपुड्याच्या अनेक भागांत त्यांनी शिकारीसाठी भटकंती केली होती. याशिवाय, त्यांनी शस्त्र विक्रीचा परवाना मिळवून त्या व्यवसायातही पाऊल टाकले. पारंपारिक चौकटीबाहेर जाऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. समाजाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सामाजिक कार्याची तळमळ त्यांना नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केली आणि त्यात त्यांना मोठे यश मिळाले. नगरसेवक म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळातच पालिकेच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
कौटुंबिक जबाबदाऱ्याही त्यांनी तितक्याच यशस्वीपणे पार पाडल्या. आपल्या लहान भावाला शिक्षण देऊन त्यांनी सिव्हिल इंजिनिअर बनवले. त्यांचे बंधू वामन पाटील सध्या दिल्लीत स्थायिक आहेत. शिकारीचा छंद असलेल्या दादांनी गॅसवर चालणारी ट्रक आणून हरवासियांना चकीत करून सोडले, हे त्यांचे दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण.
अशा विविध प्रकारे कर्तृत्ववान आणि दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व असलेले कै. रामभाऊ जगन पाटील यांचे १ जुलै १९९९ रोजी निधन झाले. आज त्यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याला सलाम! त्यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या व्यक्तींमुळेच नंदुरबारच्या इतिहासाला एक वेगळी ओळख मिळाली आहे.
Post a Comment
0 Comments