सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, २४ जून: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून, विशेषतः पिंपळनेर जवळील नवेनगर येथून सामोडेमधील घोड्यामाळला पाणीपुरवठा करण्याच्या शासनाच्या निर्णयाला १७ गावांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. २४ जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संतप्त ग्रामस्थांनी निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि या निर्णयाविरोधात प्रशासनाला निवेदनही सादर केले. प्रशासकीय उदासीनता आणि संभाव्य भ्रष्टाचाराचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
नवेनगर येथून नेले जाणारे पाणी धुळे आणि साक्री तालुक्यातील सुमारे ५०,००० लोकसंख्या असलेल्या नवेनगर, जेबापूर, सामोडेमधील पुनाजीनगर, दापूर, धंगाई, मोहाने, चिपी, चिखली, कुतरखाम या गावांच्या हक्काचे असल्याचा दावा आंदोलकांनी केला. याउलट, घोड्यामाळची लोकसंख्या केवळ २२०० असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक घरे अतिक्रमित असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एवढ्या कमी लोकसंख्येच्या आणि आधीच पाणी उपलब्ध असलेल्या घोड्यामाळला जल जीवन मिशनच्या नावाखाली पाणी नेण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आंदोलकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. यापूर्वीही त्यांनी प्रशासनाला निवेदने देऊन आपली भूमिका मांडली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. "सामोडेमधील घोड्यामाळला शासनातर्फे जल जीवन मिशन अंतर्गत भरपूर पाणी उपलब्ध असतानाही, हे पाणी नेण्याचा प्रयत्न केवळ जल जीवन मिशनचा निधी खर्च करून त्यातून भ्रष्टाचाराला वाट मोकळी करून देण्यासाठीच सुरू आहे," असा स्पष्ट आरोप आंदोलकांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विषयावर कुठल्याही गांभीर्याने चर्चा केली नसल्याची नाराजी १७ गावांमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. घोड्यामाळला पाण्याची गरजच नसताना, तिथे अगोदरच तीन नद्यांचा त्रिवेणी संगम असल्याने भरपूर पाणी उपलब्ध असतानाही हा निर्णय घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जर प्रशासनाने घोड्यामाळला पाणी देण्याचा प्रयत्न केला तर, "आम्ही जलसमाधी घेऊ," असा गंभीर इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
या १७ गावांचा लढा प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आणि त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र होत असून, यावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Post a Comment
0 Comments