सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार पोलिसांच्या तत्परतेमुळे कुटुंबीयांचे अश्रू झाले आनंदाश्रू
नंदुरबार, २५ जून: नंदुरबार पोलिसांनी कर्तव्यदक्षता आणि माणुसकीचं उत्कृष्ट उदाहरण सादर करत, घरातून निघून गेलेल्या एका व्यक्तीचा अवघ्या १५ मिनिटांत शोध लावला. यामुळे चिंताग्रस्त कुटुंबियांना मोठा आधार मिळाला असून, सर्वत्र पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.
नंदुरबार येथील रहिवासी संजय पाटील हे २२ जून रोजी रागाच्या भरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर, त्यांच्या नातेवाईकांनी परिवारासोबत थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांची भेट घेऊन घडलेली सविस्तर माहिती दिली.
अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी या घटनेची तात्काळ आणि संवेदनशीलतेने दखल घेतली. त्यांनी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्याशी संपर्क साधून, तातडीने शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कसलाही वेळ न घालवता, कर्तव्यदक्षतेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यांनी अवघ्या १५ मिनिटांत मोबाइल लोकेशनच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या तांत्रिक पथकाने तपास करताना संजय पाटील यांचे मोबाइल लोकेशन सुरतजवळील चलथान परिसरात असल्याचे निदर्शनास आणले.
या माहितीनंतर किरणकुमार खेडकर यांनी सुरत येथील पोलीस मित्रांच्या मदतीने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संजय पाटील यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करून दिला. हा भावनिक क्षण उपस्थितांसाठी अत्यंत हृदयस्पर्शी ठरला. व्हिडिओ कॉलवर संजय पाटील यांच्याशी बोलताना त्यांच्या परिवाराच्या डोळ्यांतून आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर मदतीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपनगर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, आणि हवालदार विकास पाटील यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे. त्यांनी केवळ आपली पोलिसिंगची जबाबदारीच नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारीही उत्कृष्टपणे पार पाडली. "अधिकारी असा असावा, जो फक्त नियम न पाहता माणुसकीही जपतो" या उक्तीचं हे जिवंत उदाहरण आहे. नंदुरबार पोलिसांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि तत्परता नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Post a Comment
0 Comments