सहसंपादक अनिल बोराडे
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील दहिवेल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या राष्ट्रीयीकृत बँकेची फक्त एकच शाखा असल्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक व्यवहार करताना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. बँकेचा सर्व्हर डाउन असणे आणि वेळेवर पैसे न मिळणे यांसारख्या समस्या नित्याच्याच झाल्या होत्या. यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतानाही नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या.
या गंभीर समस्येकडे दहिवेलचे उपसरपंच नंदकिशोर पाटील, पंचायत समिती सदस्य संगीता गणेश गावित, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित, साखरपाडा येथील डॉ. अनिल पवार आणि दहिवेल येथील कनालाल माळी यांनी नंदुरबार लोकसभेचे लोकप्रिय खासदार, माननीय ऍड. गोवाल पाडवी यांचे लक्ष वेधले. त्यांनी संयुक्तिकपणे खासदारांना लेखी निवेदन सादर केले.
खासदार पाडवी यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेतली. त्यांनी धुळे येथील डाक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि दहिवेल येथे नवीन मध्यवर्ती डाकघर (पोस्ट बँक) सुरू करण्याबाबत संबंधित व्यवस्थापकांना पत्र दिले. तसेच, दूरध्वनीवरूनही त्यांनी पाठपुरावा केला.
खासदारांच्या या प्रयत्नांमुळे डाक विभागाचे अधिकारी चौधरी यांनी दहिवेलमधील उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. लवकरच दहिवेल येथे मध्यवर्ती डाकघर सुरू होऊन दहिवेल आणि परिसरातील नागरिकांची आर्थिक व्यवहारांची गैरसोय दूर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे दहिवेल परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे आता खातेदारांना दैनंदिन धावपळ करावी लागणार नाही आणि आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होतील.
Post a Comment
0 Comments