सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील पापडीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कविता शामभाऊ गावीत यांनी, त्यांना 'शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धे'त मिळालेल्या जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाच्या आणि तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या बक्षीस रकमेतून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे भेट म्हणून दिली. त्यांच्या या कृतीने समाजात एक चांगला संदेश गेला आहे.
श्रीमती गावीत यांनी आपल्या मेहनतीने आणि कल्पकतेने तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओमुळे हे पुरस्कार पटकावले होते. त्यांना मिळालेल्या या बक्षीस रकमेचा उपयोग त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला, हे विशेष.
या दप्तर वाटप कार्यक्रमाप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, पालक, ग्रुप ग्रामपंचायत शेलबारी येथील सरपंच वंदना भोये, ग्रामसेवक बागुल भाऊसाहेब आणि पापडीपाडा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिव्यता सोनवणे उपस्थित होत्या. सर्वांनी श्रीमती कविता गावीत यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि सामाजिक जाणिवेचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या या कृतीमुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर पालकांनाही आनंद झाला असून, इतर शिक्षकांसाठीही हा एक आदर्श ठरला आहे.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता, समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असे विधायक कार्य करणे महत्त्वाचे आहे. श्रीमती गावीत यांच्या या योगदानामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक आवड निर्माण होईल आणि ते अधिक उत्साहाने शाळेत येतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.
Post a Comment
0 Comments