सहसंपादक अनिल बोराडे
निजामपूर (धुळे): साक्री तालुक्यातील एका गावात चौथीत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून फरार झालेल्या नराधम चुलत काकाला निजामपूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर गावानजीकच्या जंगलात लपून बसलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पीडित मुलीच्या पालकांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात पीडितेच्या चुलत काकानेच हा अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, गुन्हा समोर येताच आरोपी फरार झाला होता.
निजामपूर पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात असतानाच, गुप्त माहिती मिळाली की तो रायपूर जंगल परिसरात लपून बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. निजामपूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच, नराधम काकाने पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या घटनेचा अधिक तपास निजामपूर पोलीस करत आहेत.
Post a Comment
0 Comments