Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळे येथे आणीबाणीच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त 'संघर्षयात्रीं'चा गौरव: हुकूमशाहीच्या काळ्या पर्वाची आठवण

सहसंपादक अनिल बोराडे 

 धुळे, भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने धुळे येथे आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या ३५ 'संघर्षयात्रीं'चा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देऊन या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आयोजित प्रदर्शनाची पाहणीही जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्यासह इतर मान्यवरांनी केली.

'अत्याचाराचा कळस गाठलेला काळ': मदनलाल मिश्रा



या कार्यक्रमात आणीबाणीचा अनुभव घेतलेले ज्येष्ठ संघर्षयात्री मदनलाल मिश्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आणीबाणीत मनमानीपणाचा कळस गाठून प्रचंड प्रमाणात अत्याचार करण्यात आले. सर्वसामान्यांनी नरकयातना भोगल्या. पोलिसांनी या काळात प्रचंड अत्याचार केले," असे ते म्हणाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे लादलेली आणीबाणी ही भारताच्या प्राचीन लोकशाही मूल्यांवर घाला घालणारी होती, असे मिश्रा यांनी नमूद केले.



मदनलाल मिश्रा यांनी १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आल्याची आठवण करून दिली. सर्वोच्च न्यायालयातून निराशा मिळाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. "या काळात हुकूमशाहीला विरोध करणाऱ्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. अनेकांचे हात-पाय तोडण्यात आले, काहींना जीवानीशी मारण्यात आले. भयानक परिस्थिती असताना ज्यांनी कारावास भोगला, त्यांच्या परिवारावरही मोठे संकट कोसळले होते," असे त्यांनी सांगितले. कारावास भोगलेल्यांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबांचे योगदानही तितकेच मोठे होते, असे सांगत त्यांनी त्यावेळी पोलिसांची प्रचंड दहशत होती असेही नमूद केले. शासन स्तरावरून आज संघर्षयात्रींचा सन्मान होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

'कैद्याप्रमाणे वागणूक आणि कुटुंबांवर संकटे': रवी बेलपाठक

यावेळी बोलताना रवी बेलपाठक यांनी ४ जुलै रोजी संघावर बंदी घालण्यात आल्याची आठवण करून दिली. त्यांनी संघाच्या कामात स्वतःला झोकून दिले होते आणि त्यावेळी पुकारलेल्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. १४ नोव्हेंबर १९७५ रोजी झालेल्या पहिल्या सत्याग्रहात त्यांनी लोकांना उद्युक्त करण्याचे काम केले. "कारागृहात आम्हाला कैद्याप्रमाणे वागणूक मिळत होती. तो काळ अतिशय वाईट होता," असे बेलपाठक यांनी सांगितले. त्यावेळी समाजमाध्यमे नसल्याने एकमेकांशी संपर्क साधूनच बातम्या समजत होत्या आणि सरकार सांगेल त्याच बातम्या प्रसारित होत होत्या, असेही त्यांनी नमूद केले. २१ ते २२ महिन्यांचा काळ त्यांनी तुरुंगात घालवला. आणीबाणीच्या काळात अनेक जण तुरुंगात अडकल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले, मुलांचे शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष झाले, यावर त्यांनी भर दिला.

धुळ्यातील गौरवलेले संघर्षयात्री

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या हस्ते गौरवण्यात आलेल्या धुळे जिल्ह्यातील आणीबाणीतील कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींमध्ये मदनलाल जमनालाल मिश्रा, भिमसिंग रायसिंग राजपूत, माधव जनार्दन बापट, मधुसूदन उर्फे विजय शांताराम पाच्छापुरकर, यादवराव शामराव पाटील (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी, गोपालदास जमनालाल मिश्रा (प्रतिनिधी), हरसिंग गोरखसिंग जमादार (गिरासे), शशिकांत रनाळकर (प्रतिनिधी), रविंद्र बेलपाठक, रेणुका बेलपाठक, शेखर वसंत चंद्रात्रे (प्रतिनिधी), भास्कर बापट, प्रभाकर भावसार, डॉ.भुपेंद्र शहा, शीला सत्यानारायण अग्रवाल, मंजुळाबाई श्रीपत पाटील, मालती नवनीतलाल शाह, पुष्पा सुभाष शर्मा, प्रविण कृष्णदास शहा, श्रीराम पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकला सोमनाथ जोशी (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक मराठे, शशीकला देविदास शार्दुल, रविंद्र वामन सोनवणे, भिकुबाई शामराव मराठे, डोंगर कन्हैया बागुल, शकुंतलाबाई जूगलकिशोर अग्रवाल यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्यासह अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नायब तहसीलदार श्रीकांत देसले, यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंबिय आणि वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा गौरव सोहळा आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments