संपादकीय
नवापूर तालुक्यातील वळफळी येथे विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकरी सखाराम देवजी वळवी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने पंचनामा करून सखाराम वळवी यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काल (सोमवारी) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वळफळी परिसरात शोककळा पसरली आहे. सखाराम वळवी यांच्या शेती कामातील आधार असलेले दोन्ही बैल विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बैलांशिवाय शेती करणे अत्यंत अवघड असल्याने, वळवी यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभाग आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असला तरी, आता प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्त्या आणि आर्थिक अडचणींनी ग्रासलेला असताना, अशा अनपेक्षित घटनांमुळे तो पूर्णपणे कोलमडून पडतो. त्यामुळे, शासनाने संवेदनशीलता दाखवत लवकरात लवकर सखाराम वळवी यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी महावितरणने जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या आणि खांब दुरुस्त करावेत, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, त्यामुळे सखाराम वळवी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments