Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कवी योगेश जाधव यांच्या 'पिंपळ' काव्यसंग्रहाचे नाशिकमध्ये थाटामाटात प्रकाशन

 सहसंपादक अनिल बोराडे 

नाशिक: राष्ट्रीय कीर्तनसम्राट डॉ. प्रा. सिन्नरकर महाराज यांच्या पवित्र भूमीत, कवी आणि संगीतकार योगेश जाधव यांच्या "पिंपळ" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा डॉ. भूपाल देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटित करण्यात आला, तर सुहास टिपरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कीर्तनचंद्रिका वैजयंती सिन्नरकर, संजय आहेर आणि अलकसम्राट सुभाष उमरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर योगेश जाधव यांनी शाल, गुलाबपुष्प आणि पेन देऊन मान्यवरांचा सत्कार केला. विशेषतः, वैजयंती सिन्नरकर यांचा साडी, गुलाबपुष्प आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला.

आपल्या मनोगतात योगेश जाधव म्हणाले की, "वास्तववादी लिखाणापेक्षा काल्पनिक आणि नैसर्गिक लेखनात अधिक आनंद मिळतो. कारण नैसर्गिक लेखन आपल्याला निसर्गाकडून प्राप्त होते आणि निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्यामुळे आपण निसर्गावर लिहिले पाहिजे." 'पिंपळ' काव्यसंग्रहाची महती सांगताना जाधव यांनी सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून ते आपल्या खिडकीतून पिंपळाचे झाड पाहत आहेत आणि याच निरीक्षणातून त्यांना आपल्या काव्यसंग्रहाला 'पिंपळ' हे नाव देण्याची प्रेरणा मिळाली.

अध्यक्षीय भाषणात सुहास टिपरे यांनी सांगितले की, माणूस एकदा ध्येय निश्चित करतो तेव्हा ते निश्चितपणे पूर्ण होते. योगेश जाधव हे निसर्गावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाला 'पिंपळ' हे नाव देऊन आपले ध्येय साध्य केले तसेच निसर्गाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.


यावेळी डॉ. भूपाल देशमुख, वैजयंती सिन्नरकर, संजय आहेर आणि सुभाष उमरकर या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मेतकर यांनी केले, तर वैजयंती सिन्नरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रकाशन सोहळ्यात साहित्यिकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले, त्यानंतर कविसंमेलनात अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. याप्रसंगी अलकाताई दराडे, अजय बिरारी, निशांत गुरु, विलास पंचभाई, रतन हिरे, सोमनाथ पगार, निजामपूरकर सर, कविता कासार, भाऊसाहेब, गोरख पालवे, घोडेराव सर, जादूगार तुषार कन्नडकर, क्षितिजा खटावकर, सोनाली भट आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments