सहसंपादक अनिल बोराडे
दोंडाईचा शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता आता दूर झाली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या एका धडक कारवाईत मोटारसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या कारवाईत सात महागड्या दुचाकींसह एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या पाच मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या यशस्वी कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली. शहरात मोटारसायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता, या गुन्हेगारांचा शोध घेणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले होते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखा आणि दोंडाईचा पोलिसांनी या गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी विशेष पथके तयार केली होती.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुली येथे संशयित अवस्थेत उभा असलेला खुशाल ऊर्फ दादू परमेश्वर गोसावी (वय १९, रा. मालपुर, ता. शिंदखेडा) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, खुपशेर गोसावीने धक्कादायक कबुली दिली. त्याने सांगितले की, तो आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकल चोऱ्या करत असे. त्याच्याकडून पोलिसांनी ३ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या एकूण ७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या जप्त केलेल्या मोटारसायकलींमध्ये विविध कंपन्यांच्या आणि मॉडेल्सच्या दुचाकींचा समावेश आहे, ज्या वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरल्या गेल्या होत्या.
या कारवाईमुळे दोंडाईचा शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे मोटारसायकल चोरांना चांगलाच वचक बसला असून, पुढील काळात अशा घटनांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
यशस्वी कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी:
ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये असई. संजय पाटील, पोहकॉ. सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, पोकॉ. विनायक खैरनार, हर्षल चौधरी तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रवीण निंबाळे, राजेंद्र एंडाईत आणि रमेश वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सध्या पोलीस फरार असलेल्या अन्य दोन साथीदारांचा कसून शोध घेत आहेत आणि लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments