नंदुरबार प्रतिनिधी:नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कापूस बियाणे विकणाऱ्यांवर धाड टाकली. यात तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ गावात प्रतिबंधित आणि संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने सापळा रचला.
धाड आणि मुद्देमाल जप्त
कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत, मोहन पाटील आणि योगेश पाटील यांच्या राहत्या घरी प्रतिबंधित कापूस बियाणे विकताना एका खाजगी व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांनी मोहन पाटील आणि संबंधित उत्पादक कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे, मोहीम अधिकारी सचिन देवरे यांनी योगेश पाटील आणि त्यांच्या उत्पादक कंपनीविरुद्ध तक्रार दिली आहे. बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कृषी विभागाच्या पथकाची कामगिरी
नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे, नंदुरबार कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, नाशिकचे तंत्र अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक उल्हास ठाकूर, आणि कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक कल्याण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके, मोहीम अधिकारी सचिन देवरे, शहादा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश साठे, कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे, योगेश हिवराळे, पेंढारकर, महेश विसपुते, खर्डे आणि पराडके यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात कठोर इशारा
या कारवाईनंतर नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, "प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही."
या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांनी सावध रहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Post a Comment
0 Comments