सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, 31 मे 2025: राज्यात खळबळ उडवून दिलेल्या धुळे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणात तब्बल नऊ दिवसांच्या सखोल तपासानंतर अखेर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान गुलमोहोर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या 1 कोटी 84 लाख रुपयांच्या घबाडप्रकरणी समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील, राजू मोगरे आणि अन्य एका आरोपीविरोधात कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 264/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाच्या तपासात पुढे आणखी निष्पन्न झाल्यास कलमे वाढवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या 11 आमदारांच्या अंदाज समितीला देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये गुलमोहोर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे व पदाधिकाऱ्यांनी केला होता. खोलीची झडती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावे यासाठी चार तास ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. अखेर चार तासांनी वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर खोलीची झडती घेतल्यानंतर त्यात तब्बल एक कोटी 84 लाख रुपये सापडले होते. या रकमेवर कुणीही दावा केला नसल्याने ही रक्कम कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, माजी आमदार गोटे यांनी समितीला देण्यासाठीच ही रक्कम गोळा केल्याचा दावा केला होता.
स्वीय सहाय्यकाचे निलंबन आणि गुन्हा दाखल:
या प्रकरणात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते व त्यांनी धुळे शहर सोडून जाऊ नये, असे आदेशही पोलिसांनी पाटील यांना दिले होते. नऊ दिवसांच्या तपासाअंती धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे स्वीय सहाय्यक किशोर पाटील, राजू मोगरे आणि अन्य एका व्यक्तीविरोधात कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम?
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (मुंबई पोलीस कायदा) मधील कलम 124 मालमत्तेच्या बेकायदेशीर मालकीशी संबंधित आहे. ज्याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही. या कलमांतर्गत, जर कुणी व्यक्ती अशा मालमत्तेची मालकी करत असेल आणि तिच्या मालकीबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नसेल तर त्याला शिक्षेची त्यात तरतूद आहे.
पुढील तपास आणि आयकर विभागाचा सहभाग:
सदरचा तपास एसडीपीओ श्री. राजकुमार उपासे यांना देण्यात आला आहे. तपासात पुढे अजून जे निष्पन्न होईल त्यानुसार कायदेशीर कलमे वाढवण्यात येणार आहेत. या प्रकरणातील आयकर विभाग देखील स्वतंत्र तपास करत आहे. या प्रकरणाने विधिमंडळ अंदाज समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे हा रूम रजिस्टर असल्याने अर्जुन खोतकर यांच्यावर देखील विरोधकांनी आरोप केले होते.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुढील तपास आणि आयकर विभागाचा अहवाल या प्रकरणाला कोणती नवी दिशा देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments