नंदुरबार, १६ मे २०२५: जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मार्च २०२५ मध्ये 'ऑपरेशन शोध' ही विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान नवापूर पोलीस ठाण्यासह शहादा व शहर पोलीस ठाण्याच्या पथकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हरवलेल्या एकूण ९८ महिला व बालकांपैकी ८३ महिला व १५ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे!
राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि महिला व बालविकास मंत्रालयाने हरवलेल्या महिला व बालकांच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवत विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने, अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त यांच्या नेतृत्वाखाली १७/०४/२०२५ ते १५/०५/२०२५ या दरम्यान जिल्ह्यात 'ऑपरेशन शोध' मोहीम राबविण्यात आली.
या विशेष मोहिमेत विविध पोलीस ठाण्यांमधील तसेच उपविभागीय कार्यालयांतील पथकांनी एकत्रितपणे काम केले. हरवलेल्या ९८ महिला व बालकांचा शोध घेणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट होते आणि यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे, शहादा शहर, शहादा ग्रामीण आणि नवापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी करत हरवलेल्या महिला व बालकांना शोधण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या शोधकार्यात पोउपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे (नवापूर पो.ठाणे), असई/भगवान धानक (शहादा पोलीस ठाणे), पोहेकॉ/योगेश लोंढे, मपोकॉ/वर्षा पानपाटील (म्हसावद पो.ठाणे) यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल बोलताना सांगितले, "हरवलेल्या महिला व बालकांना शोधणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि आमच्या टीमने ते अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडले आहे. 'ऑपरेशन शोध' हे केवळ एक अभियान नसून, बेपत्ता व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात उत्कृष्ट काम केले, त्यांचे मी अभिनंदन करतो."
यापुढेही महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सतत प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले, "यापुढील काळातही महिला व बालकांच्या बाबतीत कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे, जेणेकरून अशा घटनांना वेळीच प्रतिबंध घालता येईल."
'ऑपरेशन शोध'च्या या मोठ्या यशामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि पोलीस दलाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments