Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेरचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत दाखल – अंकुश पाठक यांची VanCity Cup स्पर्धेसाठी निवड

 सहसंपादक अनिल बोराडे

पिंपळनेर गावासाठी अभिमानाचा क्षण उगवला आहे. गावचा सुपुत्र, खेळाची निस्सीम निष्ठा असलेला आणि मैदानावर धडाकेबाज खेळ करणारा अंकुश राजेंद्र पाठक यांची निवड अमेरिका व कॅनडा येथे होणाऱ्या VanCity Cup या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा २० मे २०२५ रोजी संपन्न होणार असून, जगभरातील एकूण २४ नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.



अंकुश पाठक हे नाव आता केवळ पिंपळनेरपुरते मर्यादित राहिले नसून, देशाच्या क्रीडा विश्वातही त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. शिस्त, मेहनत आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. एक वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पेथ पेज न्यूयॉर्क इस्लाइडर कप स्पर्धेत त्यांनी सहभाग घेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्या या यशस्वी कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय खेल गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.


अंकुश पाठक यांची कारकीर्द ही सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारी ठरली आहे. २०२२ साली त्यांनी ईस्ट आफ्रिका व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच लंडनमध्ये झालेल्या एजे विल्यम कप मध्ये भाग घेतला होता. त्याआधी २०२१ मध्ये त्यांनी दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत दमदार सहभाग नोंदवला होता. त्यांच्या खेळातील झेप, अचूकता आणि संघभावना यामुळे त्यांना नेहमीच विशेष स्थान मिळत गेलं.


VanCity Cup मध्ये सहभाग ही त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मोलाची पायरी ठरणार आहे. अशा पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होणे ही मोठी संधी असते आणि अंकुश त्या संधीचे सोने करण्यास नक्कीच समर्थ आहे.


पिंपळनेर शहरासह संपूर्ण जिल्ह्याला त्यांच्या या यशाचा अभिमान वाटत आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत. भारताचं, महाराष्ट्राचं आणि पिंपळनेर शहराच नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करण्याचा ध्यास घेऊन अंकुश पुन्हा एकदा मैदानात उतरतो आहे – जय पराजय काहीही असो, पण त्यांचा हा प्रवास नक्कीच गौरवास्पद आहे.अंकुश चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

Post a Comment

0 Comments