सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात भीमगीतांचा एक भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. भीम जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ बागले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांनी आपल्या प्रभावी गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आपल्या गाण्यांमधून समाजाची व्यथा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरी समाज आणि भीमसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी, ठाणे जिल्ह्याचे आंबेडकरी समाजाचे बुलंद आवाज भाऊसाहेब इंदासे, दोंडाईचा शहराचे माजी नगराध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक, नवापूरचे नगरसेवक नरेंद्र भाऊ नगराळे, नंदुरबारचे नगरसेवक आण्णासाहेब पेंढारकर, सुरत शहराचे समाजभूषण कुणाल भाऊ सोनवणे, धुळे शहरचे माजी नगरसेवक जितू भाऊ शिरसाठ, वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद भाऊ माणिक, भीम आर्मी धुळे जिल्हा महासचिव नवनीत बागले, वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा युवक उपाध्यक्ष राहुल भाऊ पाटोळे, शहादाचे सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भाऊ ठाकरे, विशाल बागले (बाम्हणे) यांच्यासह हजारो कार्यकर्ते, महिला भगिनी आणि भीमसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व विशद केले आणि समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले. भाऊसाहेब इंदासे यांनी आपल्या भाषणातून आंबेडकरी चळवळीच्या कार्यावर प्रकाश टाकला. इतर मान्यवरांनीही डॉ. आंबेडकरांच्या कार्याला उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कडुबाई खरात यांनी आपल्या खणखणीत आवाजात भीमगीते सादर करून उपस्थितांना एका वेगळ्याच वातावरणात नेले. त्यांच्या ओजस्वी गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि अनेकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीम जयंती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा मिळाला आणि समाजबांधवांमध्ये एकतेचा संदेश पोहोचला.
Post a Comment
0 Comments