सहसंपादक अनिल बोराडे
थाळनेर: थाळनेर पोलिसांनी (दिनांक २५/०४/२०२५) रोजी मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या या कारवाईत पोलिसांनी १ पुरुष आणि १ महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल २,२९,३३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार, एक व्यक्ती गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान करून, तर दुसरी एक महिला पंजाबी ड्रेसमध्ये आणि तोंडाला काळ्या रंगाची ओढणी बांधून विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून चोपडा रोडने शिरपूरच्या दिशेने गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी तात्काळ कारवाई करत राजपत्रित अधिकारी श्री. रविंद्र कुमावत (नायब तहसीलदार, शिरपूर), वजनकाटाधारक, फोटोग्राफर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने शिरपूर-चोपडा रोडवरील भाटपुरा चौकीजवळ सापळा रचला.
काल सायंकाळी १६:०५ वाजता, बातमीत नमूद केलेल्या वर्णनाप्रमाणे पुरुष आणि महिला मोटरसायकलवरून येत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्या ताब्यातील सॅक बॅग आणि गोणीमध्ये २४.१९० किलो ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला, ज्याची किंमत १,६९,३३०/- रुपये आहे. यासोबतच पोलिसांनी ६०,०००/- रुपये किंमतीची मोटरसायकल देखील जप्त केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे इम्रान लियाकत अली सैय्यद (वय- ३९ वर्षे, रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड) आणि समीना शेख अफसर शेख (वय ३४ वर्षे, रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना, हल्ली मुक्काम बंगाली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड) अशी आहेत. आरोपींनी या अमली पदार्थांबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्याविरुद्ध थाळनेर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
या यशस्वी कारवाईमध्ये मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो. श्री. किशोर काळे, आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. दिलीप पवार हे करत आहेत. या कारवाईमुळे थाळनेर परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा धक्का बसला आहे.
Post a Comment
0 Comments