Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दहिवेल-पिंपळनेर मार्गावर एसटी बस आणि मजुरांच्या रिक्षाची भीषण धडक; दहा ते बारा महिला गंभीर जखमी, परिसरात शोककळा

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर : दहिवेल-पिंपळनेर मार्गावर काल सायंकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. चिंचपाडा फाट्याच्या पुढे चिंचपाडा येथे कांदा काढणीसाठी गेलेल्या महिला मजुरांच्या रिक्षाला भरधाव वेगात आलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या (एसटी) बसने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षातील दहा ते बारा महिला मजूर गंभीर जखमी झाल्या असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विविध भागांतील महिला मजूर चिंचपाडा येथे कांद्याच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास काम आटोपून या महिला एका रिक्षातून (क्रमांक MH 41L 3551) आपल्या गावी धनाईकडे परतत होत्या. त्याचवेळी, नवापूरकडून नाशिकच्या दिशेने जाणारी एसटी बस क्रमांक MH 14 BT 1830 भरधाव वेगात मागून आली आणि तिने महिलांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.


एसटी बसची धडक इतकी जबर होती की, रिक्षा अक्षरशः रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आणि त्यात बसलेल्या महिला मजूरही रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या. या रिक्षात एका पुरुष चालकासह एकूण 21 महिला मजूर प्रवास करत होत्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच धावपळ सुरू झाली.

या अपघातात आठ ते दहा महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने दहिवेल येथील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील नागरिक आणि चिंचपाडा व मैदाने येथील ग्रामस्थांनी त्वरित मदतकार्याला सुरुवात केली. जखमी महिलांना रुग्णवाहिकेतून तातडीने दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले.

दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या सहा महिला मजुरांची प्रकृती अधिक नाजूक असल्याने त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी धुळे येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, महिला मजुरांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या अपघाताच्या कारणांचा अद्याप स्पष्टपणे उलगडा झालेला नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बसचा वेग जास्त होता. दहिवेल पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. एसटी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, या दुर्घटनेची कसून चौकशी सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. गरीब कुटुंबातील या महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करत होत्या आणि आज त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाने जखमी महिलांना योग्य उपचार आणि मदत पुरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments