संपादकीय
नाशिक: नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज दिनांक २३/०४/२०२५ रोजी यशस्वी सापळा कारवाई करत एका शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. जितेंद्र खंडेराव सोनवणे (वय ४५ वर्षे), असे या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते बागलाण तालुक्यातील ततानी येथील शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे रोजनदारी शिक्षक असून त्यांची घरघंटी आहे. त्यांना आश्रमशाळेतील धान्य दळण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तक्रारदाराच्या दळणाचे ८७,४८०/- रुपयांचे बिल बँकेत जमा झाले होते. या बिलाच्या मोबदल्यात आरोपी जितेंद्र सोनवणे यांनी तक्रारदाराकडे ८,०००/- रुपये बक्षीस म्हणून तसेच मार्च २०२५ व एप्रिल २०२५ या महिन्याचे दळणाचे बिल मंजूर करण्यासाठी १,३००/- रुपये, अशी एकूण ९,३००/- रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आज सापळा रचण्यात आला. पंच साक्षीदार क्रमांक १ यांच्या समक्ष आरोपी सोनवणे यांनी तक्रारदाराकडून ८,०००/- रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे, तक्रारदाराने आरोपीच्या कार्यालयात लाचेची रक्कम दिली. आरोपी लाचेची रक्कम मोजत असताना त्याला संशय आला आणि त्याने ती रक्कम टेबलावर ठेवली. तक्रारदार कार्यालयाच्या बाहेर इशारा करण्यासाठी येत असताना, आरोपी दुसऱ्या दरवाजाने पळून गेला.
सदर प्रकरणी आरोपी जितेंद्र सोनवणे यांच्याविरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आरोपीच्या घरी झडती सुरू असून, त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई केली जात आहे. घटनास्थळावरून हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
ही सापळा कारवाई पोलीस उप अधीक्षक श्रीमती स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शरद हेबाडे, पोलीस नाईक युवराज खांडवी, आणि चा.पो.हवा संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने यशस्वी केली. या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी मार्गदर्शन केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.असे आव्हान वारंवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येत करण्यात येत असतो
Post a Comment
0 Comments